ग्रामीण भागांना शहराशी जोडणारा विकाससेतुचा निर्माता – नितीन काळजे

कालावधी : 14 मार्च 2017 ते 24 जुलै 2018

एका युवकाने शहर आणि गाव यांच्यातली दरी मिटविण्यासाठी मोठ्या जिद्दीने व तळमळीने प्रयत्न केले. या प्रयत्नांना अभ्यासाची जोड दिली आणि पाहता पाहता त्याने गाव आणि शहराला जोडणारा एक विकाससेतु तयार केला. त्या युवकाच्या रूपाने शहराच्या ग्रामीण भागाला खऱ्या अर्थांने विकासाचा एक चेहरा मिळाला. त्याच्या प्रयत्नाने शहारातील समाविष्ठ गावांना त्यांचे हक्क प्राप्त झाले. या “विकाससेतू’ च्या निर्माणकर्त्याचे नाव आहे, नितीन काळजे !

ग्रामीण भाग तसा शहरापासून अलिप्त असतो. शहरी सोयी-सुविधांचा अभाव, शिक्षणाच्या गैरसोयी, रस्ते, वीज, पाणी, आरोग्यसेवा अशा सर्व आवश्‍यक बाबींची वानवा, अशा वातावरणात वाढलेल्या एका युवकाला शहर आणि गावं यांच्यातली दरी मिटवायची होती.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 24 व्या महापौरपदी नितीन काळजे यांची 14 मार्च 2017 ला निवड झाली. या संधीच सोन करत नितीन काळजे यांनी शहराच्या ग्रामीण भागाला एक नवीन ओळख दिली. शहरातील तळवडे, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी या शहरात समावेश असलेल्या ग्रामीण भागाचा त्यांनी कायापालट केला.

त्यांनी त्यांच्या काळात ग्रामीण भागात केलेली कामे आज डौलाने उभी आहेत. याच कामांमुळे तेथील नागरिकांना आपली गावे एका श्रीमंत महापालिकेत जोडली असल्याचे समाधान आहे.

नितीन काळजे यांनी महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील सर्व जागांची प्रथम माहिती घेऊन सोयी सुविधांचे कामकाज विभागांच्या माध्यमांतून सुरू करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने या काळात प्रथमच गावांसाठी रस्ते विकास धोरण राबविले.

त्यासाठी एक हजार कोटींच्या 50 नवीन रस्त्यांची बांधणी करण्यात आली. चऱ्होली येथील वाघेश्‍वर मंदिर परिसरातील टेकडीवर त्यांनी दोन हजार वृक्षांची लागवड केली. चऱ्होली, मोशी, डुडुळगाव भागासाठी पोस्टाच्या ग्रामीणऐवजी शहरी पिनकोड घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

उत्तम आरोग्यासाठी क्रीडा महत्त्वाच्या आहेत. हे जाणून काळजे यांनी शहरातील उद्यानांमध्ये ओपन जीम तयार केल्या. तसेच वार्षिक खर्चापैकी 5 टक्के खर्च क्रीडा क्षेत्रासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. ग्रमीण भागात त्यांनी नवीन इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली.

शहरातील स्वच्छतेबाबत माजी महापौर नितीन काळजे यांनी विविध निर्णय घेतले. शहर स्वच्छतेवर भर देण्यासाठी मोशी येथील कचरा डेपो समस्या, विद्युतविषयक कामकाज, रस्ते गटारी, नाले सफाईसाठी नवीन होणाऱ्या प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागामध्ये एका संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आरोग्य आणि वैद्यकिय सुविधांबाबत काळजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वायसीएम आणि तालेरा रुग्णालयामध्ये त्यांनी रक्तपेढी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा आज करोनाच्या काळामध्ये सर्वाधिक झाला. तसेच वायसीएम रुग्णालयामध्ये शवविच्छेदन सेंटरला जागा उपलब्ध करून दिली. वायसीएम रुग्णालयामध्ये पदव्युत्तर संस्था सुरू करण्यासाठी त्यांनी तज्ञ डॉक्‍टरांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव तयार केला.

महापालिकेच्या सभागृहामध्ये तैलचित्रे लावण्याचा विषय अनेक दिवस प्रलंबित होता. याठिकाणी स्वांतत्र्यवीर दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावावे अशी नागरिकांची इच्छा होती. त्याला मूर्त स्वरुप देण्याचे काम नितीन काळजे यांनी केले. त्यांच्या कार्यकाळात या दोन्ही महापुरुषांचे तैलचित्र सभागृहामध्ये लावण्यात आले. नाट्यरसिकांसाठी सांगवी येथे सर्वात मोठे नटसम्राट निळू फुले रंगमंदिराची उभारणी केली. 

महापालिकेने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात देशातील सर्वात उंच 107 मीटर उंचीचा स्तंभ उभारला आहे. या स्तंभावर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महापौर नितीन काळजे यांच्या उपस्थितीत पहिले ध्वजारोहण व उदघाटन करण्यात आले.

नितीन काळजे खऱ्या अर्थाने शहरातील ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरा झाले. त्यासोबतच त्यांनी शहरात अनेक सोयी-सुविधा उभ्या केल्या. तळा-गाळातल्या नागरिकांना त्याचा फायदा झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.