Nitin Gadkari PM Post Offer । भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील बड्या नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला होता. त्यांच्या या विधानावर आता भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र, आता भाजप खासदार नारायण राणे यांनी नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांचे वक्तव्य राजकीय की वैयक्तिक मला माहीत नाही Nitin Gadkari PM Post Offer ।
नारायण राणे रविवारी सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी “नितीन गडकरी हे मोठे नेते आणि माझे मित्र आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाच्या ऑफरबाबत केलेले वक्तव्य राजकीय की वैयक्तिक हे मला माहीत नाही. मी त्या विषयावर बोलणार नाही,” अशी मोघम प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यानंतर राणे यांनी या विषयावर फारसे बोलण्यास नकार दिला. एकूणच नारायण राणे यांनी भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणेच सावधानतेचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.
गडकरींनी अचूक राजकीय टायमिंग साधले Nitin Gadkari PM Post Offer ।
गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधानपदाचा पर्यायी चेहरा म्हणून भाजपमध्ये कोणतेही नेतृत्व उदयाला आले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर मित्रपक्षांच्या कुबड्यांचा आधार घेऊन नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापन करावे लागले. त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गत परिस्थिती बदलेल, अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा किस्सा नितीन गडकरी यांनी नेमका आताच सांगून अचूक राजकीय टायमिंग साधले आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण होऊ शकते, याची चर्चा अधुनमधून सुरु असते. या शर्यतीमध्ये योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, आता नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे भावी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक तगड्या चेहऱ्याची भर पडली आहे. त्यासोबतच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा
एनडीए सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता; ‘एक देश, एक निवडणूक’बाबत मोठी अपडेट समोर