नवी दिल्ली –केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रशंसा केल्यानंतर कॉंग्रेसने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. मास्टरशेफ गडकरी यांचे तरी सीतारामन यांना पचावे, असा शाब्दिक टोला कॉंग्रेसने लगावला.
केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असताना 1991 मध्ये देशात आर्थिक सुधारणांचे पाऊल उचलण्यात आले. त्यावेळी सिंग हे केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या आर्थिक सुधारणांविषयी सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिकूल भाष्य केले. संबंधित आर्थिक सुधारणा अर्धवट स्वरूपाच्या होत्या, असे त्यांनी म्हटले. त्यांना सीतारामन यांनी अर्धवट शिजलेल्या अन्नाची उपमा दिली.
त्या पार्श्वभूमीवर, गडकरी यांनी मंगळवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना सिंग यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. उदार अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यासाठी देश सिंग यांचा ऋणी आहे, असे ते म्हणाले. सिंग यांनी आर्थिक सुधारणांचे सत्र सुरू केल्यानंतरच्या काही काळातच मी महाराष्ट्राचा मंत्री बनलो. त्या सुधारणांमुळेच मी महाराष्ट्रातील रस्तेबांधणीसाठी पैसा उभा करू शकलो, अशी प्रांजळ कबुलीही गडकरी यांनी दिली.
गडकरी यांनी मांडलेल्या त्या भूमिकेचा आधार घेत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सीतारामन यांना लक्ष्य केले. अर्धवट शिजलेल्या अन्नाची उपमा देत आर्थिक सुधारणांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सीतारामन यांनी केला. मात्र, आता मास्टरशेफ गडकरी यांच्यामुळे पूर्ण शिजलेले अन्न पुढे आले. ते सीतारामन यांना पचेल अशी आशा करूया, अशी प्रतिक्रिया रमेश यांनी ट्विटरवरून दिली.