सातारा – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवार, दि. 25 रोजी कराड येथे येणार असून, विविध रस्त्यांचे लोकार्पण व प्रस्तावित कामांच्या कोनशिलांचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे.
एकूण 5971 कोटी रुपयांच्या 403 किमी लांबीच्या रस्त्यांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण कराड येथील द फर्न रेसीडन्सी येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
कागल-सातारा रस्ता सहापदरीकरण, मसूर फाटा, इंदोली, काशीळ रस्ता अपघात प्रवण क्षेत्र सुधारणा, मिरज शहरांतर्गत रस्त्यांची एक वेळ सुधारणा, आजरा-अंबोली-संकेश्वर रस्त्याचे उन्नतीकरण, कळे-कोल्हापूर रस्त्याचे उन्नतीकरण, घाटमाथा ते हेळवाक रस्ता मजबुतीकरण या कामांच्या कोनशिलांचे अनावरण आणि नागज-मुचंडी रस्ता उन्नतीकरण,
तासगाव-शिरढोण रस्ता उन्नतीकरण या कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत डिचोली-हल्वाक-बहाटळ-शेणोली स्टेशन रस्त्याची सुधारणा, पाटण- तारळे-काशिळ 19 किमी रस्त्याची सुधारणा, वेल्हे-जेजुरी-लोणंद-सातारा 3.40 किमी रस्त्याचे चौपदरीकरण, शिरसावडी-शेनवडी-खेराडे 12 किमी रस्त्याची सुधारणा, मांडवे-नागठाणे-नांदगाव रस्ता सुधारणा, फलटण-आशू-तावशी 28 किमी रस्ते सुधारणा, बुध-निढळ-पेडगाव-वडूज 20 किमी रस्त्याची सुधारणा, फलटण-उपळवे-कुलकजाई 5 किमी रस्त्याची सुधारणा या कामांचाही समावेश आहे.