विदर्भात आर्थिकदृष्ट्‌या सक्षम असणारे कृषी उद्योग स्थापन करायचे आहेत

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर- जैवइंधन, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन यासारख्या कृषीपूरक व आर्थिकदृष्ट्‌या सक्षम असणारे कृषि उद्योग विदर्भात स्थापन करुन ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांचे राहणीमान उंचावणे हे ऍग्रोव्हिजनचे उद्देश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात केले.

ऍग्रोव्हिजन फाऊंडेशनतर्फे कृषी प्रदर्शन यावर्षी 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आयोजित केले जाणार असून, यासंदर्भात माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना ते बोलत होते.

मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असणा-या ऍग्रोव्हिजनचे हे 11 वे वर्ष असून यंदा एम.एस.एम.ई. नोंदणीकृत उद्योगांचे दालन, तसेच जैवइंधन व जैवउर्जा यावर आधारित दालने हे विशेषत: स्थापण्यात येतील. रामटेक तालुक्‍यात नॅपीअर ग्रासची लागवड केल्याने डिझेलला पर्याय ठरणाऱ्या बायो सी.एन.जी.ची निर्मिती या गवतापासून करता येणे शक्‍य होणार आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या ताफ्यातील सुमारे 50 बसेस आता बायो सी.एन.जी. वस संचालित झाल्या आहेत.गडचिरोली, चंद्रपूर,गोंदीया यासारख्या वनव्याप्त जिल्ह्यांमध्ये मधाचे उत्पादन वाढण्यासाठी 2 लाख मधुमक्षीका पेटींची मागणी करण्यात आली आहे तसेच या जिल्ह्यात जट्रोफा या जैवइंधनाच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या बिया वाटपाचाही कार्यक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.