नेवासा – भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्तापदी नेवासा तालुक्याचे भूमिपुत्र व नगर जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन सुरेश दिनकर यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर जिल्ह्यातून नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन दिनकर यांच्या निवडीचे मुंबई येथे सत्काराद्वारे स्वागत केले आहे. मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी यासाठी शिफारस केली होती.
नितीन दिनकर हे नेवासा नगरीचे रहिवासी असून लहानपणासूनच ते संघ परिवाराला जोडले गेल्याने राष्ट्रसेवा, समाजसेवेचे बाळकडू त्यांना संघाच्या तालिमातून मिळालेले आहे. पक्षाशी एकनिष्ठ असल्याने पक्षाने त्यांना नेवासा भाजप तालुकाध्यक्षपदाची संधी दिली होती. त्या संधीचे सोने करत त्यांनी तळागाळातील भाजप पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले.त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे बूथ प्रमुख म्हणून काम केले.
पक्षवाढीसाठी देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांची प्रदेश कार्यकारिणीने दखल घेतली. भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी राज्यातून 42 निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रवक्तेपदी निवड व्हावी, म्हणून शिफारशी केल्या. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन दिनकर यांची नगर जिल्ह्यातून प्रदेश प्रवक्ता म्हणून निवड केल्याने त्यांच्या निवडीचे नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून स्वागत केले.