Nitesh Rane: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि दुरवस्थेवरून तत्कालीन उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात भाजप नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राणे आणि त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी तांत्रिकदृष्ट्या एका कलमांतर्गत त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने त्यांना एक महिन्याचा कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. काय आहे प्रकरण? (Nitesh Rane) Nitesh Rane: नीतेश राणेंना ‘चिखलफेक’ प्रकरणात मोठा दिलासा, मात्र एका कलमाखाली महिनाभराचा कारावास आणि दंड हे प्रकरण नीतेश राणे काँग्रेसमध्ये असतानाचे आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि चिखलामुळे होणाऱ्या त्रासाचा जाब विचारण्यासाठी राणे यांनी समर्थकांसह आंदोलन केले होते. यावेळी संतापलेल्या राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. “सामान्य जनता रोज या चिखलाचा सामना करते, आज तुम्ही तो अनुभवून पहा,” असे म्हणत राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेनंतर शेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नीतेश राणे, माजी नगराध्यक्ष बाबू गायकवाड आणि बांधकाम सभापती संजय कामतेकर यांच्यासह ४० कार्यकर्त्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणाची सविस्तर सुनावणी पूर्ण केल्यानंतर नीतेश राणे यांची भादंवि कलम ३५३, ३३२ आणि ५०६ या गंभीर कलमांतून सुटका केली. सरकारी कामात अडथळा आणणे आणि धमकावणे या आरोपांतून ते निर्दोष सुटले आहेत. मात्र, कलम ५०४ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने त्यांना एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी यासाठी राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी तातडीने अर्ज केला असून, लवकरच या निर्णयाविरोधात रिव्हिजन अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नारायण राणेंनी टोचले होते कान – Nitesh Rane विशेष म्हणजे, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तत्कालीन परिस्थिती पाहता नीतेश राणे यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या हिंसक आंदोलनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर संताप असणे स्वाभाविक असले तरी, अशा प्रकारे अधिकाऱ्यावर चिखलफेक करणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. “मुलाने केलेल्या चुकीच्या कृत्याचे मी समर्थन करणार नाही आणि प्रसंगी त्याला माफीही मागावी लागेल,” अशा शब्दांत त्यांनी नीतेश राणे यांचे कान टोचले होते. न्यायालयाने आता या प्रकरणाचा निकाल लावल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, हे चिखलफेक प्रकरण जुलै २०१९ मध्ये घडले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली जवळील गडनदी पुलावर रस्त्याच्या दुरवस्थेचा जाब विचारताना नीतेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल ओतला होता. या घटनेनंतर राणेंना अटकही झाली होती आणि त्याचे राजकीय पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते.