सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे हे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा मविआवर सडकून टीका केली आहे. महायुती सरकारमध्ये आमचे तीन तीन सिंघम आहेत. तुमच्यासारखे शक्ती कपूर नाहीत असे म्हणत त्यांनी मविआवर टीका केली आहे.
नेमके काय म्हणाले नितेश राणे?
महायुती सरकारमध्ये आमचे तीन तीन सिंघम आहेत. तुमच्यासारखे शक्ती कपूर नाहीत. सिंघम आल्यानंतर गुंड पळून जातात, घाबरतात. महाविकास आघाडीमध्ये 100 शक्ती कपूर आहेत. आमच्या सिंघमने बदलापूरमध्ये काय केलं, हे तुम्ही पाहत असालच. येणाऱ्या काळात देखील तुम्हाला असेच पाहायला मिळेल. असा मिश्किल टोला भाजप आमदार नितेश राणेंनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
पैसे घेऊन पोलिसांच्या बदल्या केल्या
महाविकास आघाडीच्या काळात मातोश्रीच्या वहिनींचा म्हणजेच रश्मी ठाकरे यांचा पोलिसांच्या बदल्या करण्यात किती मोठा हस्तक्षेप होता. तेव्हा कंटेनरमधून पैसे बाहेर पाठवले जात होते. आमच्यावर बदल्या करून पैसे घेण्याच्या आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा इतिहास तपासावा. असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.