उपअभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना अटक 

सिंधुदुर्ग – उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिविगाळ करणे, तसेच त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याप्रकरणी कणकवलीचे कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आमदार राणे यांच्यासह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,पोलीस स्टेशनमध्येही आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांसोबत अरेरावी केली असल्याचे समजते.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या करकवलीकरांच्या रोषाचा फटका आज महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना बसला. महामार्गाच्या दुरावस्थेसाठी शेडेकर यांना जबाबदार धरत आमदार नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गडनदीवरील पुलावर बांधून ठेवले. तसेच महामार्गावरून प्रवास करताना सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा अनुभव उपअभियंत्यांनाही व्हावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी त्यांना चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली.

गेल्या काही दिवसांपासून कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दरम्यान, महामार्गावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी अखेर आज आपला रोष महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यासमोर व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.