सिंधुदुर्ग- शिवसेनेच्या पुढाकारानं राज्य सरकारनं गरिबांसाठी सुरू केलेल्या ‘शिवभोजन थाळी’च्या धर्तीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव व भाजपचे आमदार नीतेश राणे आपल्या मतदारसंघात ‘कमळ थाळी’ सुरू करणार आहेत. ही थाळी गरिबांना मोफत मिळणार आहे.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होत आहे. त्यांना आधार म्हणून राज्यभरात अनेक लोक मदतीसाठी पुढं येत आहेत. नीतेश राणे यांनीही तसंच पाऊल उचललं आहे. नीतेश राणे हे सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्या मतदारसंघात कणकवली नगरपंचायतीच्या सहकार्यानं ‘कमळ थाळी’चा उपक्रम सुरू होत असून त्या अंतर्गत दररोज गरिबांना विनामूल्य भोजन दिलं जाणार आहे. ‘कमळ थाळी’मुळं गरिबांना नक्कीच मदत होईल, असा विश्वास नीतेश यांनी व्यक्त केला आहे.