‘बिहारी गुंडा’ म्हटल्याच्या आरोपावरून वादंग

तृणमूलच्या खासदार महुआ मित्रा यांनी फेटाळले आरोप

नवी दिल्ली – तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मित्रा यांनी आपल्याला उद्देशून बिहारी गुंडा असे संबोधल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय गटाच्या बैठकीमध्ये मित्रा यांनी आपल्याला उद्देशून तीन वेळा ही शेरेबाजी केल्याचा आरोप दुबे यांनी आज लोकसभेमध्ये केला. आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीही असा अनुभव घेतलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार म्हणून आपण 13 वर्षे कार्यरत आहोत. पण संसदीय समितीच्या बैठकीमध्ये आपल्याला “बिहारी गुंडा’ म्हणून संबोधले गेले. असे हिणवण्यामागे आपला काय गुन्हा झाला होता ? आपल्या आयुष्यात आपण मजूरी केली आहे.उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशात आपण खूप कष्ट केलेले आहेत. हा आपला गुन्हा होता का? असा प्रश्‍न दुबे यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केला. दुबे यांनी याबाबत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडेही तक्रार केली आहे.

तृणमूल कॉंग्रेसला हिंदी भाषिकांची ऍलर्जी आहे. म्हणूनच मित्रा यांनी मला बिहारी गुंडा’ म्हणून संबोधले, त्याबद्दल मित्रा यांनी माझी माफी मागायला पाहिजे अशी मागणीही दुबे यांनी केली.

मात्र महुआ मित्रा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आतापर्यंत न झालेल्या बैठकीमध्ये आपण ही शेरेबाजी केल्याचा आरोप केला जात आहे, असे उत्तर त्यांनी दिले आहे. “सदस्यच उपलब्ध नसल्यामुळे ही बैठकच झाली नव्हती. जो व्यक्ती उपस्थितच नव्हता त्यांना मी कसे संबोधू शकते, असे मित्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजप नेत्यांनी काल आयटी समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि हजेरी रजिस्टरवर सही करण्यास नकार दिला होता. शशी थरूर यांना आयटी कमिटीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी दुबे यांनी केलेली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर हा वाद उफाळला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.