श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील स्वयंसेवी संस्था आणि विश्वस्त संस्थांच्या आर्थिक व्यवहारांच्या मुद्दयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने काश्मीर खोऱ्यातील 9 आणि दिल्लीतील एका ठिकाणी छापे घातले आहेत. सेवाभावी कार्यासाठी जमा केलेला निधी जम्मू काश्मिरातील अलिप्ततावादी आणि विभाजवादी कारवायांकडे वळवण्याच्या संदर्भात ही कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या छाप्यांदरम्यान काही गुन्हेगारी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आले आहेत, असे “एनआयए’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फलाह-ए-आम ट्रस्ट, दिल्लीतील चॅरिटी अलायन्स, ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन, जेके यतीम फाउंडेशन, साल्वेशन मुव्हमेंट आणि जे के व्हॉइस ऑफ व्हिक्टीम्स या संस्थांशी संबंधित ठिकाणांवर “एनआयए’ने हे छापे घातले. सेवाभावी कार्यासाठी मिळवलेला निधी विभाजनवाद्यांच्या कारवायांसाठी वापरला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी भारतीय दंड संहिता आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली प्रकरण दाखल करण्यात आले होते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.