नीरव मोदीच्या कोठडीत 24 मे पर्यंत वाढ

लंडन – ब्रिटन येथील न्यायालयाने भारतातील कर्ज बुडवणारा व्यापारी नीरव मोदी याच्या कोठडीत 24 मे पर्यंत वाढ केली आहे. गेल्या महिन्यापासून तो लंडन पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याच्या आधीच्या कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्याला व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे कोर्टापुढे उभे करण्यात आले त्यावेळी त्याच्या कोठडीत वाढ करण्याचा आदेश कोर्टाने दिला. त्याचा जामीन अर्ज कोर्टाने या आधीच फेटाळून लावला आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अटक झाल्यानंतर नीरव मोदीची रवानगी लंडनच्या वॅंड्‌सवर्थ कारागृहात करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला 20 मार्चला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला त्याच दिवशी कोर्टात हजर केले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने टाकलेल्या दबावानंतर इंग्लंडने ही कारवाई केली.

भारतीय बॅंकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.
दरम्यान, भारतातून पैसे बुडवून फरार झालेल्या नीरव मोदीने इन्व्हेस्टर व्हिसा योजनेचा लाभ घेऊन लंडनमध्ये प्रवेश केला होता. ब्रिटनमध्ये अतिश्रींमत व्यक्तींना किमान दोन दशलक्ष पौंडाची गुंतवणूक केल्यानंतर गोल्डन व्हिसा दिला जातो आणि त्याआधारे त्यांना तेथे निवासाचे हक्क मिळतात. त्याचाच वापर करून नीरव मोदी लंडनमध्ये आश्रयाला गेला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.