निर्मलनगरवासियांना सिटी बस सुरु होण्याची प्रतीक्षा

नागरिकांची पायपीट : बिघडले वेळापत्रक

चोवीस पैकी 10 लाख भरले

सिटी बस चालविण्यासाठी तिकिटाच्या साडेतीन टक्के इतकी रक्कम मनपाने आरटीओकडे कर म्हणून भरावयाची असते. मात्र ती कोणी भरायची, याचा ठेकेदाराशी झालेल्या करार पत्रात उल्लेख नसल्याने ती कोणी भरायची, या वादात थकीत रक्कम वाढली. चोवीस लाख रुपयांपैकी मनपाने 10 लाख रुपये आरटीओकडे भरले मात्र उर्वरित रक्कम भरल्याशिवाय आरटीओ बससेवा सुरू करण्यास परवाना देणार नाही. त्यामुळे निर्मलनगरवासीयांच्या नशिबी अजून काही काळ तरी प्रतीक्षाच आहे.

नगर – गेल्या वर्षभरापासून बंद असलेली सिटी बस सेवा पुन्हा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत निर्मलनगरवासीय आहेत. शहराशी जोडले जाण्याचा दुवाच सिटी बस बंद झाल्याने संपुष्टात आला आहे. आता शहरात यायचे म्हटले तरी सुरवातीलाच 1 ते 2 किमीची पायपीट करावी लागते. सिटी बस सुरू झाल्यास या भागातील नागरिकांची गावात येण्यासाठीची दीड ते दोन किलोमीटरची पायपीट थांबणार आहे.

सिटी बस सुरू असताना सकाळी 6.45 ला पहिली, तर सायंकाळी 7.45 ला शेवटची बस या भागात यायची या दरम्यानच्या काळात 1 तासाच्या अंतराने सिटी बसच्या फेऱ्या या भागात सुरू असायच्या त्यामुळे निर्मलनगर हे उपनगर अगदी शहरालगत वाटायचे. मात्र सिटी बस बंद झाल्यामुळे हा भाग ही शहरापासून तुटल्यासारखा झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. सुरुवातीच्या काळात या भागात जाण्यासाठी मुबलक प्रमाणात रिक्षा होत्या.

मात्र हल्ली रिक्षावालेही नित्यसेवापर्यंतच रिक्षा नेतात. त्यापुढे जाण्यास ते फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे निर्मलनगर आणि त्या लगतच्या परिसरातील म्हणजेच शिवनगर, लेखानगर, संचारनगर या भागातील नागरिकांनाही आपापल्या वसाहतींतून नगरमध्ये यायचे म्हटल्यास घरापासून किमान एक ते दोन किमी पायपीट करावी लागते. शिवाय रिक्षावालेही थेट रिक्षा केल्यास अव्वाच्यासव्वा पैशांची मागणी करतात.

सकाळी शाळेच्या वेळात आणि सायंकाळी शाळा, कार्यालये सुटण्याच्या वेळेत यापूर्वी सिटी बसची सोय असल्याने त्याभागातील नागरिकांची विशेषतः महिला व मुलांची मोठी सोय व्हायची मात्र सिटी बस बंद झाल्यामुळे या भागातील नागरिकांचे वेळापत्रक बिघडले आहे. सिटी बस सुरू झाल्यास या भागातील नागरिकांची पायपीट आणि वेळ सुद्धा वाचणार असल्याने सिटी बस सुरू होण्याच्या प्रतीक्षेत या परिसरातील नागरिक आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)