निर्मला सीतारमण ठरल्या पहिल्या महिला अर्थमंत्री 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिपदे आता जाहीर झाली आहेत. अर्थमंत्रालयाचा कार्यभार निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यासोबतच निर्मला सीतारमण पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. मोदी सरकारच्या मागील कार्यकाळात त्या पहिल्या संरक्षण मंत्री ठरल्या होत्या. दरम्यान, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काही काळासाठी त्यांच्याकडे अर्थमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची जबादारी होती. परंतु, निर्मला सीतारमण पाच वर्षांसाठी म्हणजेच पूर्णवेळ अर्थमंत्री असून त्यांच्याकडे कॉरर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाची जबाबदारीही सोपविण्यात आलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सलग दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर कोणाला कोणती पदे मिळणार याबाबत कमालीची उत्सूकता होती. अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणाने मंत्रिपद देऊ नये, अशी विनंती केली होती. यानंतर अर्थमंत्रालयाची जबादारी अमित शहांकडे जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या स्पर्धेत अर्थमंत्री म्हणून पियुष गोयल यांचेही नाव अग्रस्थानी होते. परंतु, अमित शहा यांना गृहमंत्री तर पियुष गोयल यांना रेल्वेमंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आणि निर्मला सीतारामन यांना पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.