Nirgundi Benefits : अंगदुखी, सूज आणि वातहारक निर्गुंडी एक ना अनेक फायदे

वातहारक – निर्गुंडी अत्यंत वातहारक आहे. वाताने शरीरात कोठेही दुखत असल्यास निर्गुंडीचा वाफारा देतात. वाफारा दोन प्रकारे घेतात. निर्गुंडीची पाने एका मडक्‍यात घालून ते मडके विस्तवावर लाल होईतोपर्यंत तापवावे. नंतर ते लाल झालेले मडके उतरून, त्यातील पाने काढून वायूने दुखत असलेल्या जागेवर सोसतील तितकी कढत बांधावीत. यामूळे वात कमी होतो, दुखणे थांबते. दुसऱ्या पद्धतीत एका पसरट भांड्यात निर्गुंडीचा पाला घालून, ते बुडेल इतके पाणी घालावे व ते भांडे विस्तवावर ठेवून चांगली वाफ येऊन लागली म्हणजे ती वाफ वाताने दुखत असलेल्या जागेवर घ्यावी, वात विकार बरा होतो.

सुज – निर्गुंडीचा पाला वाटून ऊन करून कोणत्याही प्रकारच्या सूजेवर बांधतात. मुका मार व सूज कमी होते. उत्साहवर्धक वाटण्यासाठी – आपल्याला ताजेतवाने व प्रसन्न वाटण्यासाठी निरगुडीच्या पाल्याने स्नान करतात. या आरोग्यदायी स्नानासाठी निर्गुंडीच्या पाल्याचे कडू पाणी प्रथम स्नानास घ्यावे. चांगला चार बुचका निर्गुंडीचा पाला व तितकाच कडुलिंबाचा पाला, बोटभर वेखंडाचा तुकडा, सुंठीचे कुडे व मूठभर ओवा एकत्र बांधून ती पुरचुंडी पाण्यात घालून आंघोळीचे पाणी तापवावे. चांगले आधण आले म्हणजे उतरून अंगावर घेण्यास सोसेल एवढे करून त्याने स्नान करावे. या पाण्यास कडू पाणी असे म्हणतात. कडू पाण्याचे स्नान बाधत नाही.दुखण्यातून बरे झाल्यावर पुष्कळ दिवसांनी स्नान करण्याचा प्रसंग आला असता देखील हे कडू स्नान करतात. ( Nirgundi Benefits )

शक्तिदायी – निर्गुंडीची मुळे शक्ती येण्यासाठी चाटण घेतात. डोळ्यांना खुपऱ्या झाल्या असता – डोळ्यास खुपऱ्या झाल्या असता, एका मडक्‍यात निर्गुंडीची पाने एक मुठभर घालून गळ्यापर्यंत पाणी घालावे व चुलीवर ठेवावे. चांगले उकळले की, मडक्‍यास फडके बांधावे. त्यातून वाफ येईल त्यावर डोळे धरावेत. अशा प्रकारे डोळ्यास वाफ घेतली असता, खुपऱ्या कमी होतात. ऊन कमी झाल्यावर अथवा कडकडीत ऊन पडण्यापूर्वी, दिवसास एक वेळ सोसेल एवढी 10 मिनिटेपर्यंत पानाची वाफ घ्यावी व नंतर डोळे चांगल्या थंड पाण्याने धुवून टाकावे. खुपऱ्यांस फायदा होतो.

अंगदुखी व ताप – अंग मोडून सर्व अंग दुखून ताप येतो. अंगातून कळा येऊ लागतात. थोडा खोकला येतो व चांगली झोप येत नाही. असा हायमोड ताप ज्याला इंग्रजीत डेंग्यू असे म्हणतात. तो ताप दिवसातून दोन वेळा निर्गुंडीच्या पानांची वाफ पाच-सात दिवस घेतल्याने साफ बरा होतो.

अंगदुखी, सूज आणि वातविकार – निर्गुंडीचे तेल हे अंगदुखीवर प्रभावी आहे. याचा उपयोग वायुने दुखत असलेल्या अंगाला चोळण्यासाठी होतो. ( Nirgundi Benefits )

निर्गुंडीचे तेलाची कृती ः निर्गुंडीच्या पानांचा वाटलेला गोळा जेवढा असेल त्याच्या चौपट तेल घालावे, हे तेल मोहरीचे असेल तर फार उत्तम. तेलाच्या चौपट दह्याचे पाणी घालावे व मंदाग्नीवर पाणी संपेपर्यंत आठवावे. गाळून वायू असलेल्या जागेवर चोळावे. वायू कमी होतो. दुःख थांबते, सूज कमी होते. अशाप्रकारे निर्गुडी ही गुणकारी औषधी वनस्पती आहे.

( Nirgundi Benefits )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.