निरगुडसर बुधवारपर्यंत बंद राहणार

करोना रुग्णांची संख्या वाढल्याने खबरदारीचा उपाय

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील निरगुडसर येथे गेल्या चार पाच दिवसांत 25 रुग्ण करोनाबाधित सापडल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून बुधवार (दि. 20) पर्यंत गावबंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. तसेच मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी गावात भेट देऊन करोना नियंत्रण समितीला मार्गदर्शन सूचना केल्या आहेत.

करोनामुक्त झालेल्या निरगुडसर गावात काही दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसमारंभात बाहेरून आलेल्या पाहुणे/मित्रमंडळी यांच्यामुळे करोनाचा संसर्ग वाढला असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे निरगुडसर ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील 77 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

यात 12 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गावात गेल्या पाच/सहा दिवसांत 25 रुग्ण सापडले आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे गावात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निरगुडसर ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारी घेत गाव चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंद कार्यकाळात गावातील अत्यावश्‍यक सेवा मेडिकल, दवाखाने, वगळता सर्व हॉटेल, भाजीपाला, केशकर्तनालय, पान टपरी व इतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

दरम्यान पोलीस निरिक्षक सुधाकर कोरे यांनी रविवारी (दि. 17) भेट देऊन करोना नियंत्रण समितीला मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, सोसायटीचे सचिव शंकर लबडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवराज हांडे, संतोष वळसे पाटील, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव वळसे पाटील, माजी सरपंच फकिरा वळसे पाटील, ज्ञानेश्‍वर टाव्हरे आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.