निर्भयाच्या मित्राने वृत्तवाहिन्यांकडून मुलाखतीसाठी पैसे उकळले

पत्रकार अजित अंजुम यांचा धक्‍कादायक खुलासा

नवीदिल्ली : 2012 च्या डिसेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार कांडामुळे संपूर्ण देश हादरला. अत्यंत अमानुषपणे निर्भयावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला मरण यातना देण्यात आल्या. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली. ज्यानंतर देशात एक आंदोलनाचा एक वणवाच पेटला होता. ही घटना जेव्हा घडली तेव्हा निर्भयासोबत तिचा मित्रही होता. त्याच मित्राबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निर्भयाच्या मित्राने वृत्तवाहिन्यांना मुलाखती देण्याच्या बदल्यात लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणारे पत्रकार अजित अंजुम यांनी ट्विट करुन यासंदर्भातला खुलासा केला आहे. दोन हिंदी वृत्तवाहिन्यांचे माजी व्यवस्थापकीय संचालक असणारे अजित अंजुम यांनी या संदर्भातले ट्विट केले आहेत.

निर्भयाच्या मित्राच्या डोळ्यात मला कधीही जे घडलं त्याबद्दल वेदना दिसली नाही. त्याच्या आवाजात निर्भयाने काय भोगले आहे याचा लवलेशही नव्हता. त्याच्या जागी दुसरे कुणी असते तर तो मुलगा भावनिकदृष्ट्या कोसळून गेला असता. मात्र निर्भयाचा मित्र खुशाल पैसे घेऊन मुलाखती देत होता. त्याने निर्भयावर बलात्कार होत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केला की नाही? हा प्रश्न आजही माझ्या मनात आहे.

शो झाल्यानंतर मी त्याला बजावले की जर तू पैसे घेऊन निर्भयासोबत काय घडले ते विकणार असशील तर आम्ही तुझा पर्दाफाश करु. त्यावेळी त्याने माफी मागितली आणि तो निघून गेला. त्यानंतर तो अनेक वर्षे समोर आलाच नाही. निर्भया बलात्कार आणि हत्याकांड यावर आधारित असलेली दिल्ली क्राईम ही सीरिज मी पाहिली. ज्यानंतर मी अत्यंत अस्वस्थ झालो. ती सीरिज पाहून मला ही आठवण आली की निर्भयाचा मित्र म्हणवणारा तो वृत्तवाहिन्यांकडून पैसे उकळत होता. मी त्याला ताकीद दिली त्यानंतर त्याने माफी मागितली आणि तो त्यानंतर अनेक वर्षे दिसलाच नाही असे अजित अंजुम यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.