नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना 3 मार्च रोजी अखेर फाशी देण्यात येणार आहे. यातीलच विनय शर्मा आरोपीने भिंतीवर डोके आपटून स्वत:ला जखमी करण्याचा प्रयत्न केला होता. तर आता फाशीपासून वाचण्यासाठी त्यानं स्टेपल पिन गिळण्याचा प्रयत्न केला. तुरूंगातील कर्मचाऱ्यांनी त्याला असे करण्यापासून रोकले. यानंतर तिहार जेलमधील अधिकाऱ्यांनी विनयला त्वरित रुग्णालयात दाखल केले. सध्या विनयवर उपचार सुरू आहे.
शनिवारी तुरूंगातील अधिकाऱ्यांनी विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांच्या कुटुंबीयांना नोटिसा पाठवल्या आणि त्यांना अखेरचे भेटण्यास सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश सिंह आणि पवन गुप्ता यांच्या कुटुंबातील सदस्यांसह 31 जानेवारी रोजी अखेरची बैठक झाली. तिहार कारागृहातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी अक्षय आणि विनय यांना विचारले की त्यांना कोणाला भेटायचे आहे? त्यानंतर त्याच्या घरच्यांनी या दोघांची भेट घेतली.
तत्पूर्वी, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला होते. मात्र, हा दावा फेटाळत विनयची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, आरोपींनी सातत्याने फाशीपासून वाचण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आणि राष्ट्रपतींकडे अर्ज केला होता. मात्र,आता आरोपीचे सर्व पर्याय संपले असून न्यायालय आणि राष्ट्रपतींनी त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तर न्यायालायने 3 मार्च ही फाशीची तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाने फाशीची तारीख निश्चित केल्यापासून चारही आरोपी अत्यंत आक्रमकपणे वागत असल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.