दयेचा अर्ज फेटाळण्याची दिल्ली सरकारची शिफारस
केंद्रीय गृहमंत्रालयही दयेची शिफारस नाकारण्याची शक्यता
तिहारमध्ये जल्लाद नसल्याने कारागृह प्रशासनापुढे नवा पेच
नवी दिल्ली : संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या दिल्ली येथील निर्भया प्रकरणात फाशी ठोठावण्यात आलेल्या आरोपीचा दयेचा अर्ज फेटाळण्याची प्रक्रिया गृहमंत्रालयाने सुरू केली आहे. त्यामुळे या नराधमांना लवकरच फासावर लटकवले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, तिहार कारागृहात सध्या जल्लाद नसल्याने कारागृह प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
निर्भया प्रकरणातील पाच आरोपींपैकी एकाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. हा अर्ज राष्ट्रपतींनी मत मागवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली सरकारकडे पाठवला. हा अर्ज फेटाळण्यात यावा अशी शिफारस करण्याच निर्णय गृहमंत्रालयाने घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. दिल्लीतील केजरीवाल सरकारने या आरोपींना दया दाखवण्याचा अर्ज या पूर्वीच फेटाळला आहे.
2012मध्ये घडलेल्या या घृणास्पद गुन्ह्यातील नराधमांना कारागृह प्रशासनाने तुमची कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची सुचना केली होती. त्यापैकी विनय शर्मा याने दयेचा अर्ज दाखल केला. मात्र, पवन गुप्ता, अक्षय ठाकूर आणि मुकेशसिंह यांनी कोणतीही कार्यवाही करणार नसल्याचे स्पष्ट केले.
हा अर्ज राष्ट्रपतींकडून प्रथम दिल्ली सरकारकडे गेला. येवढा घृणास्पद गुन्हा करणाऱ्यांना दया दाखवण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्या सरकारने कळवले आहे. हा अर्ज गृहमंत्रालयाने फेटाळल्यानंतर आरोपींचा बचावाचा शेवटचा मार्गही बंद होईल. त्यानंतर त्यांना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा होईल. गृहमंत्रालयाकडून शिफारस आल्यानंतर राष्ट्रपती हा अर्ज फेटाळतील, असे मानले जात आहे.
तिहार कारागृहात सध्या हे आरोपी आहेत. तेथील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कारागृहातील फाशी देणाऱ्या जल्लादची जागा रिक्त आहे. त्यामुळे या कारागृहात फशी देण्याचे आदेश आल्यास काय करायचे याबाबत पेच कारागृह प्रशासनासमोर आहे. तिहारमध्ये संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफजल गुरूला शेवटची फाशी दिली होती. फाशी देणरा जल्लाद निवृत्त झाल्यानंतर त्याची नियुक्ती केली नाही, भारतात फाशी फार क्वचित ठोठावली जाते. त्यामुळे पूर्ण वेळ जल्लाद नेमणे उचित नाही. त्यामुळे कंत्राटी जल्लादाची नियुक्ती करण्यात येत आहे. तिहार प्रशासन अशा कंत्राटी जल्लादासाठी उत्तर प्रदेशात कोणी मिळते का? याचा शोध घेत आहे.