कोट्यवधींचा गैरव्यवहार करणाऱ्या नीरव मोदीला ठेवणार ‘या’ तुरुंगात;विशेष कोठडीची व्यवस्था

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. नीरव मोदी याने भारतातील न्यायालयात खटल्याला सामोरे जावे असे हे प्रकरण असून, त्याच्याविरुद्ध तेथे निष्पक्ष सुनावणी होणार नाही हे सिद्ध करणारा कुठलाही पुरावा नाही, असा निर्णय ब्रिटनमधील एका न्यायालयाने गुरुवारी दिला. यामुळे नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईमधील आर्थर रोड जेलमध्ये त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे. नीरव मोदीसाठी आर्थर रोड जेलमध्ये विशेष कोठडी असणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

कारागृह अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीला मुंबईत आणल्यानंतर त्याला बराक क्रमांक १२ मधील एका कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या कोठडीला कडक सुरक्षाव्यवस्था असणार आहे. “नीरव मोदीला जेलमध्ये ठेवण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जेव्हा कधी त्याचं प्रत्यार्पण होईल तेव्हा कारागृह आणि कोठडी तयार आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितसे आहे.

२०१९ मध्ये महाराष्ट्र कारागृह विभागाने केंद्राला नीरव मोदीला ठेवण्यासाठी कारागृहाची स्थिती आणि सुविधांची माहिती दिली होती. न्यायालयात सुनावणी सुरु असताना केंद्राने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाकडून सविस्तर माहिती मागवली होती.

कारागृह प्रशासनाने नीरव मोदीला ठेवलं जाणार आहे त्या कोठडीत कैद्यांची संख्या कमी असेल असं आश्वासन दिलं आहे. मोदीला जेलमध्ये कॉटनची चटई, उशी, बेडशीट आणि ब्लँकेट पुरवलं जाणार असून तीन चौरस मीटरची जागा वापरण्यासाठी मिळेल अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. याशिवाय कोठडीत पुरेसा प्रकाश, व्हेंटिलेशन असेल आणि सामान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल असंही सांगितलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.