नवी दिल्ली – भारताबाहेर पसार झालेला वादग्रस्त हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याशी संबधित हॉंगकॉंगमधील 253 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. मनी लॉण्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनायलाने (ईडी) ती कारवाई केली.
जप्त करण्यात आलेल्या संपत्तीवर नीरवशी संबंधित कंपन्यांची मालकी आहे. त्यामध्ये मौल्यवान रत्ने, दागिने आणि बॅंक ठेवींचा समावेश आहे.
बॅंकांमधील ठेवी अमेरिकी आणि हॉंगकॉंग डॉलर्सच्या स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या. याआधीही नीरवच्या कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीवर टाच आणली गेली. आतापर्यंत त्याची एकूण 2 हजार 650 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) कोट्यवधींचा घोटाळा समोर आला. त्या घोटाळ्यातील आरोपी असणारा नीरव तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी भारताबाहेर पळून गेला. त्या घोटाळ्यावरून त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. सध्या तो तेथील तुरूंगात आहे. तिथे तो भारतात प्रत्यार्पण करण्याविरोधातील खटल्यात पराभूत झाला. आता त्याला भारतात परत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.