मुंबई : देशातील पंजाब नॅशनल बॅंकेत कोट्यवधींचा घोटाळा करून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीला अखेर विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. जानेवारीपर्यंत न्यायालयासमोर हजर राहावे अन्यथा नीरव मोदीला फरार गुन्हेगार घोषित केले जाणार असल्याचा इशारा न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत दिला आहे.
Mumbai: Nirav Modi has been declared a fugitive economic offender under Fugitive Economic Offenders Act by the special Prevention of Money Laundering Act ( PMLA) court today in Punjab National Bank scam case. Order on confiscation of his properties will happen later pic.twitter.com/Uk621OICpx
— ANI (@ANI) December 5, 2019
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. सुनावणीत न्यायाधिशांनी मोदी याच्यासह त्याचा भाऊ नीशल आणि सहकारी सुभाष परब या प्रकरणातील आणखी दोन आरोपींनाही जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर रहा अन्यथा त्यांनादेखील फरार घोषित करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. कायद्यानुसार न्यायालयाने आरोपीला असा इशारा देत दिलेल्या मुदतीत आरोपीने न्यायालयासमोर हजर होणे आवश्यक आहे. परंतु त्यानंतरही तो न्यायालयासमोर हजर झाला नाही, तर त्याला फरारी आरोपी जाहीर केले जाते.
एवढेच नव्हे, तर आरोपीला फरारी घोषित केल्यानंतर तपास यंत्रणा भारतातील त्याच्या मालकीच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी दोघेही पळून गेले आहेत. मोदीला लंडन पोलिसांनी अटक केली असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रलंबित आहे. नीशल आणि सुभाष परब यांचा ठावठिकाणा नाही.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तिन्ही आरोपी देश सोडून पळून गेले होते. त्यामुळे तपास यंत्रणेने आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागितली होती. मोदी याला फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक न्यायालयाकडे केली होती. गुरूवारी यावर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायावलयाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.