सीमेवरील तणावाबाबत चीनबरोबर चर्चेची नववी फेरी

नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्याबरोबर निर्माण झालेला तणाव संपवण्याच्या हेतूने लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर भारत आणि चीनमध्ये आज चर्चेची नववी फेरी झाली. जवळपास अडीच महिन्यांनंतर ही चर्चा झाली. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनच्या हद्दीत मोल्दो ठाण्यावर सकाळी 10 वाजता ही चर्चा झाली, असे सूत्रांनी सांगितले.

या चर्चेची आठवी फेरी यापूवी 6 नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून सीमेवरील तणाव असलेल्या बिंदूच्या दोन्ही बाजूच्या निःशस्त्रीकरणाबाबत सविस्तर चर्चा केली होती. भारतीय प्रतिनिधींचे नेतृत्व लेहमधील 14 कॉर्पचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी केले. चीनच्या सैन्याने निःशस्त्रीकरण करणे ही अपेक्षा भारताकडून पहिल्यापासून केली जात आहे.

चर्चेची सातवी फेरी 12 ऑक्‍टोबराल झली होती. त्यावेळी पॅनगॉंग तलावाच्य दक्षिण खोऱ्याच्या परिसरातील अनेक मोक्‍याच्या ठिकाणी असलेल्या भारतीय सैन्याने माघार घेतली पाहिजे, असा आग्रह चीनकडून धरण्यात आला होता. मात्र भारताने ही मागणी नाकारली होती. तणाव असलेल्या सर्वच ठिकाणांवर निःशस्त्रीकरण एकाचवेळी व्हायला हवे, असे भारताने तेंव्हा म्हटले होते.

पूर्व लडाखमधील उंचावरच्या ठिकाणांवरील मोक्‍याच्या ठिकाणी भारताचे 50 हजार जवान तैनात आहेत. तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे चीनचेही तेवढेच सैन्य तैनात करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटलेले आहे. दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये हा तणाव संपवण्याच्या दृष्टीने कोणताही ठोस तोडगा निघालेला नव्हता.

चर्चेच्या सहाव्या फेरीनंतर दोन्ही बाजूंनी काही निर्णय जाहीर केले होते. त्यामध्ये सीमेजवळ अधिक सैन्य तैनात न करणे, प्रत्यक्ष स्थितीमध्ये एकतर्फीपणे कोणताही बदल न करणे आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनू शकेल अशाप्रकारे कोणतीही कृती करणे टाळण्याचे मान्य केले गेले होते.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांच्यात 10 सप्टेंबर रोजी मॉस्कोमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या निमित्ताने झालेल्या बैठकीतील झालेल्या पाच कलमी कराराच्या अंमलबजावणीचे पर्याय निश्‍चित करणे हा आजच्या चर्चेचा प्रमुख उद्देश होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.