मनोरंजनाच्या विश्वात सध्या रिऍलिटी शोजचा सुकाळ आहे. यामध्ये खास करून लहान मुलांसाठीच्या स्पर्धांची संख्या वाढताना दिसत आहे. जवळपास सर्वच वाहिन्यांवर मुलांच्या सिंगिंग कॉम्पिटिशन्स दिसत आहेत. यातील बहुचर्चित “सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमाचे विजेतेपद नुकतेच प्रीती भट्टाचार्जी या चिमुकलीला मिळाले. प्रीती अवघी नऊ वर्षांची आहे. जेतेपद पटकावल्यानंतर प्रीतीला ट्रॉफीसोबत 15 लाख रुपयेही देण्यात आले.
सुपरस्टार सिंगर या कार्यक्रमाचा हा पहिलाच सिझन होता. या शोमध्ये अलका याज्ञिक, हिमेश रेशमिया आणि जावेद अली या बॉलीवूडधील नामांकित हस्तींनी परीक्षकाची भूमिका पार पाडली. या तिघांचीही लाडकी असलेल्या प्रीतीला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला आणि ती सुपरस्टार बनली. पण अद्यापही तिच्याविषयी फारशी माहिती रसिकप्रेक्षकांना नाही.
Winner #SuperstarSinger 2019 pic.twitter.com/azzwHVzCW8
— Super Star Singer (@superstarsinge) October 7, 2019
प्रीती पश्चिम बंगालमधील वर्धमान या गावची रहिवासी आहे. अत्यंत लहान वयातच प्रीतीने गायनाची सुरुवात केली आहे. सुपरस्टार सिंगर या कार्यक्रमाच्या ऑडिशनच्या वेळी “दिल विल प्यार व्यार’ हे गाणे म्हणून प्रीतीने तिन्हीही परीक्षकांचे मन जिंकले होते आणि त्यामुळे तिला स्पर्धक म्हणून निवडण्यात आले. कार्यक्रमादरम्यान तिने आपल्या मधुर आवाजाने विविध ढंगातील गाणी गाऊन परीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या ग्रॅंड फायनलमध्ये सहा स्पर्धक फायनलिस्ट म्हणून आले होते.
यामध्ये प्रीती भट्टाचार्जी, मौली, स्नेहा शंकर, हर्षित नाथ, अंकोना मुखर्जी आणि निष्ठा शर्मा यांचा समावेश होता. आपल्या पाचही प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रीतीने हे सुपरस्टारपद जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.