कराड तालुक्‍यातील नऊ जण करोनामुक्‍त

कराड -कराड तालुक्‍यातील म्हासोली, इंदोली, भरेवाडी आणि मेरमेवाडी येथील एकूण 9 जण शुक्रवारी करोनामुक्त झाल्याने त्यांना कृष्णा रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

म्हासोलीतील पाच करोनामुक्‍त रुग्णांचा यामध्ये समावेश असून सलग दुसऱ्या दिवशी तेथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत एकूण 77 करोनामुक्‍त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. वनवासमाची व मलकापूरनंतर हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोलीतील आठ करोनामुक्‍त रुग्णांना काल (दि. 28) रोजी डिस्चार्ज देण्यात आला; परंतु त्याच दिवशी रात्री आलेल्या अहवालात म्हासोलीतील आणखी आठ नव्या करोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे करोनामुक्तीचा आनंद फार काळ टिकला नाही.

दरम्यान, कृष्णा हॉस्पिटलच्या करोना कक्षात गेले काही दिवस उपचार घेत असलेली म्हासोलीतील 60 वर्षांची महिला, 50 वर्षे, 40 वर्षे व 50 वर्षे वयाचे तीन पुरुष आणि 12 वर्षांची मुलगी, अशा 5 रुग्णांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. इंदोलीतील 39 वर्षांचा पुरुष, भरेवाडीतील 52 वर्षांचा पुरुष व 43 वर्षांची महिला आणि मेरमेवाडीतील 23 वर्षांचा युवक, अशा चार बाधितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनाही घरी सोडण्यात आले. तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. शशिकिरण एन. डी., डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. विश्‍वास पाटील, वैशाली यादव, नीता शेवाळे, नीता इनामदार, मंजुषा कुलकर्णी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.