दौंड (प्रतिनिधी)- दौंड तालुक्यामध्ये सध्या करोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, सातत्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी (दि. 18) एका दिवसात तालुक्यातील विविध भागात नऊ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंड तालुक्यातील 131 संशयित नागरिकांची करोना विषाणूची तपासणी करण्यात आली होती. त्यातील 128 जणांचे वैद्यकीय अहवाल गुरुवार (दि. 18) प्राप्त झाले असून 3 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
शहरातील दत्त मंदिर परिसरातील 27 वर्षीय पुरुष, तुकाई नगर परिसरातील 8 वर्षांची मुलगी, 30 वर्षांची महिला करोनाबाधित आढळून आली आहे. तसेच राज्य राखीव दलातील गट क्र. 5 व 7 च्या प्रत्येकी एका जवानास करोनाची लागण झाली आहे. दौंडच्या ग्रामीण भागातील वेताळनगर परिसरातील 15 व 17 वर्षांच्या मुली, 42 वर्षांची महिला व 18 वर्षांचा मुलगा करोना बाधित आढळून आल्याने ग्रामीण भागात देखील करोनाचा शिरकाव झपाट्याने होऊ लागला आहे.
दौंड तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगणे गरजेचे असून शासनाच्या वतीने घालण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे नागरिकांनी पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व दौंड वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी केले आहे.