-->

इंदापुरात एकाच कुटुंबातील नऊ जणांना करोना…

चाळीस पैकी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह… 

रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर शहरात शनिवारी (दि. 13) जून रोजी दोन करोना बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने जोरदार हालचाली करून रविवारी (दि. 14) करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण चाळीस जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले होते. त्यातील एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

त्यामध्ये एक वर्षाच्या मुलालाही करोनाची बाधा झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्‍त होत आहे. तर शहरातील एका 68 वर्षीय व्यक्‍तीचा पुण्यात उपचारा दरम्यान सोमवारी (दि. 15) मृत्यू झाला आहे. इंदापूर शहरातील पहिला तर तालुक्‍यातील दुसरा बळी गेल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. यामध्ये 01, 09, 36, 40 वयाचे चार पुरुष आणि 04, 32, 48, 53, 65 पाच महिलांचा समावेश आहे, असे इंदापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले.

इंदापूर शहरात असणाऱ्या अनेक शासकीय, निमशासकीय, सहकारी व खासगी बॅंकेत व कार्यालयात काम करणारे कर्मचारी रेड झोन मधून प्रवास करून कामावर येतात. त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून, नगरपरिषदेने सर्व संस्थांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आशाही सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहीती मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिली.

नागरिकांच्या अज्ञानासमोर प्रशासन हतबल ….

इंदापूर शहरात नगरपरिषद, महसूल, पोलीस तसेच आरोग्य प्रशासन यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र मंगळवारी (दि. 16) शहारात एकूण नऊ कोरोना बाधित आढळले आहेत. तरी सकाळी टेंभुर्णी नाका येथील इंगोले मैदान येथे भरलेल्या बाजारात नागरिक कसल्याही प्रकारचे नियम पाळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांच्या अज्ञानासमोर प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.