पारनेर – तालुक्यातील निघोज येथील कन्हैया डेअरी फोडून अज्ञात चोरट्यांनी ड्रॉव्हरमधील नऊ लाख आठ हजार 510 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार आज पहाटेच्या सुमारास अडीच ते चार वाजेच्या दरम्यान घडला. याबाबत रोखपाल संतोष सीताराम लंके यांनी फिर्याद दिली. दरम्यान पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे अज्ञात तीन चोरट्यांनी श्री उद्योजक मच्छिंद्र शांताराम लंके यांचे मळगंगा मिल्क अँड ऍग्रोचे कार्यालय फोडले. तसेच कॅशिअर केबिनच्या लोखंडी खिडकीचे ग्रिल काढले. कॅश काउंटरच्या ड्रॉव्हरमधून नऊ लाख आठ हजार 510 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्यासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले. श्वानाने घटनास्थळापासून दोनशे मीटर निघोज-शिरूर रस्त्यापर्यंत माग दाखविला. तसेच ठसेतज्ज्ञांनी भेट देऊन पाहणी केली.