जिल्ह्यात 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
888जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या
सातारा (प्रतिनिधी) – विविध रुग्णालयांमधून व करोना केअर सेंटरमधून उपचार घेऊन बरे झालेल्या नऊ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मात्र, त्याचा तपशील उशिरापर्यंत समजू शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 888 इतकी झाली आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून म्हसवड व किरकसाल, ता. माण येथील अनुक्रमे 58 व 49 वर्षे वयाचे पुरुष, कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमधून म्हासोली, ता. कराड येथील 65 वर्षांचा वृद्ध व कटापूर, ता. कोरेगाव येथील 62 वर्षांचा वृद्ध, मायणी कोव्हिड केअर केंद्रातून मायणी, ता. खटाव येथील 37 वर्षांचा युवक, खावली कोव्हिड केअर केंद्रातून अनपटवाडी, ता. कोरेगाव येथील 65 वर्षांची महिला, वाई कोव्हिड केअर केंद्रातून शेलारवाडी, ता. वाई येथील 57 वर्षांचा पुरुष, शेलारवाडी (बावधन) येथील 49 वर्षांची महिला व 28 वर्षांचा युवक, अशा नऊ जणांना टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला.
190 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 14, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 29, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 53, वाई ग्रामीण रुग्णालयातील 17, शिरवळ येथील दहा, रायगाव 13, पानमळेवाडी आठ, मायणी 16 व पाटण येथील 30, अशा एकूण 190 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने पुणे येथील एनसीसीएस व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलजमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. एनसीसीएस व कृष्णा मेडिकल कॉलजकडून काल (दि. 24) रात्री उशिरा 166 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.