विविधा: निनाद बेडेकर

माधव विद्वांस

इतिहासाचे गाढे अभ्यासक, लेखक, वक्‍ते निनाद बेडेकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1949 रोजी पुणे येथे झाला.त्यांचे शिक्षण मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले व शासकीय तंत्रनिकेतन येथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला.त्यांचे आजोळ सरदार रास्ते घराण्यातील होते. त्यांच्या मातोश्रींनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महिलांचे संघटन केले होते. त्यांच्याकडून झालेल्या संस्कारामुळे लहानपणापासूनच त्यांना इतिहासाची आवड निर्माण झाली होती. अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्यांनी किर्लोस्कर कमिन्स लिमिटेड येथे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून नोकरी केली.

वर्ष 1987 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन इतिहास संशोधन करण्यासाठी ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यांना शिवचरित्राची गोडी असल्याने ते इतिहास संशोधनाकडे वळले. त्यासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपीं (भाषा) वर प्रभुत्व मिळविले. त्यामुळे बखरी व काही अस्सल कागदपत्रे, हस्तलिखितांचा अभ्यास केला आणि त्यावर त्यांनी साहित्यनिर्मिती केली व व्याख्यानेही दिली. त्यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषाही आत्मसात केल्या. प्रामुख्याने महाराष्ट्रातील तसेच मध्यप्रदेश, तमिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटकातील छ. शिवाजी महाराज व मराठेशाहीशी संबंधित किल्ले तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित ठिकाणे व तेथील त्या काळातील घटनांचा मागोवाही त्यांनी घेतला. त्यांना फोटोग्राफीची आवड होती. अनेक गडकिल्ले व ऐतिहासिक ठिकाणांची छायाचित्रे त्यांनी काढली.

मुलांमधे इतिहासाची आवड निर्माण व्हावी म्हणून पुण्याच्या संभाजी बागेत किल्ले बनविण्याची कल्पना त्यांचीच होती. भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे या संस्थांचे ते आजीव सदस्य होते. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि महाराष्ट्र कलोपासक या संस्थांचे अध्यक्ष होते. ऐतिहासिक कागदपत्रांवर त्यांनी 25 शोधनिबंध लिहिले. शिवभूषण, थोरलं राजं सांगून गेलं, गजकथा, हसरा इतिहास, दुर्गकथा, विजयदुर्गचे रहस्य, समरांगण आणि झंझावात ही निनाद बेडेकर यांची प्रसिद्ध ग्रंथसंपदा. त्यांनी गजानन मेहंदळे, डॉ. रवींद्र लोणकर या सहलेखकांबरोबर “आदिलशाही फर्माने’ हे इतिहासावर प्रकाश टाकणारे संकलित पुस्तक लिहिले. बेडेकर यांनी वयाची साठीनंतर गडप्रेमींच्यासह वर्षभरात 101 किल्ल्यांना भेटी दिल्या.

शिवकालीन व मराठेशाही इतिहासाबद्दलचा त्यांचा अभ्यास व तळमळ पाहून गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. 10 मे 2015 रोजी त्यांचे निधन झाले. अशा महान इतिहासकाराला अभिवादन.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×