निमोणे (वार्ताहर) – निमोणे (ता. शिरुर) येथे घाटकोपर येथून आलेला ४७ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर निमोणे गाव व परीसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे १४ दिवस मेडिकल, दवाखाने या वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, बँका बंद राहणार आहेत.निमोणे येथील कोरोना बाधित रुग्णाला आधीच क्वारंटाईन करण्यात आले होते.त्यामुळे तो कोणाच्याही संपर्कात आलेला नाही.अशी माहिती ग्रामसेवक विकी पोळ तसेच सरपंच बेबीताई भालेकर यांनी “दै.प्रभात” शी बोलताना दिली.
२६ मे रोजी मुंबई येथील घाटकोपर परिसरातून ३ जणांचं कुटुंब निमोणे येथे आल होत. त्यात ४७ वर्षीय व्यक्ती, पत्नी आणि मुलाचा समावेश होता. निमोणे ग्रामपंचायतीच्या वतीने या तिघांनाही जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. ३० मे रोजी या ४७ वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने आरोग्य खात्याने त्यांना पुणे येथे पाठविले होते तिथं तपासणी दरम्यान त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे जिल्हा परीषद शाळेच्या संपुर्ण परीसरात हायफोक्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. तसेच गावातील आशा वर्कर आणि शिक्षक यांच्या मिळुन १३ टिम तयार करण्यात आल्या आहेत. या १३ टिम संपुर्ण गावात फिरुन सर्वेक्षण करणार आहेत.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे तसेच निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ इंदिरा डॅनियल यांनी दिली.