Nimisha Priya : येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने एका नागरिकाच्या हत्येप्रकरणी भारतीय वंशाच्या मल्याळी नर्सला फाशीची शिक्षा सुनावली आहे. निमिषा प्रिया असे या नर्सचे नाव आहे. निमिषाला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून तिची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत फाशीची शिक्षा सुनावली आहे. एक वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर, कनिष्ठ न्यायालयाने 2018 मध्ये निमिषाला फाशीची शिक्षा सुनावली होती, ज्याला निमिषाच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु तिथेही तिची निराशा झाली.
भारत सरकारच्या वकिलाने गुरुवारी (16 नोव्हेंबर) दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने निमिषाची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. निमिषाच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून येमेनला जाण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, निमिषा प्रिया ही केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी आहे, ती 2014 किंवा कदाचित त्याआधीही पतीसोबत येमेनला गेली होती. मात्र, आर्थिक संकटामुळे पती व मुले परत आले, मात्र निमिषा तिथेच राहिली.
द न्यूज मिनिटच्या रिपोर्टनुसार, 2014 मध्ये निमिषा प्रियाने येमेनमध्ये क्लिनिक उघडण्यासाठी मदतीसाठी तलाल अब्दो महदीशी संपर्क साधला होता. तलाल हा निमिषाचा नवरा टोनी थॉमसचा मित्र होता. 2015 मध्ये, निमिषाने तिचा मित्र अब्दुल हनानच्या मदतीने एक क्लिनिक उघडले, ज्यासाठी तिला तलालकडून कोणतीही मदत मिळाली नाही. मात्र, निमिषाने क्लिनिकमधून कमाई सुरू केल्यावर तलालने आपल्या वाट्याची मागणी करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. अहवालानुसार तलालने लग्नाची बनावट कागदपत्रेही बनवली आणि निमिषा त्याची पत्नी असल्याचा दावा केला.
2016 मध्ये निमिषाने तलालची पोलिसात तक्रार केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, मात्र तुरुंगातून बाहेर येताच त्याने निमिषाचा पासपोर्ट स्वतःजवळ ठेवला. 2017 मध्ये, तिचा पासपोर्ट परत मिळवण्यासाठी, निमिषाने तलालला मादक इंजेक्शन दिले होते जेणेकरून ती तलालवर नियंत्रण ठेवू शकेल. इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे तलालचा मृत्यू झाला. या घटनेत त्याच्यासोबत अब्दुल हनानचाही सहभाग होता.
तलालच्या मृत्यूनंतर निमिषा आणि अब्दुल हनान यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. यासाठी दोघांनी तलालच्या मृतदेहाचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत टाकले. दरम्यान,निमिषा आणि हनान या दोघांनीच तलालचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले. ऑगस्ट 2017 मध्ये पोलिसांनी दोघांनाही अटक केली आणि नंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर निमिषाची शिक्षा फाशीत बदलण्यात आली आणि अब्दुल हनानची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली.
दरम्यान, निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा केवळ येमेनचे राष्ट्रपतीच माफ करू शकतात, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. निमिषा प्रियाच्या शिक्षेविरोधातील याचिकेवर येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल अलीमी यांनी निर्णय दिल्यास फाशीची शिक्षा माफ होऊ शकते.