निंबाळकर सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक : चंदू बोर्डे

पुणे: भाऊसाहेब निंबाळकर हे सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. अर्थात, यामुळे त्यांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही, अशा शब्दांत माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी माजी क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांना आदरांजली वाहिली.

महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पूना क्‍लब येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बोर्डे यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी पूना क्‍लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील, शशांक हळबे, ऋपी चैनानी उपस्थित होते.

बोर्डे म्हणाले, निंबाळकर हे खूप चांगले फलंदाज होते. ते उजव्या हाताने फलंदाजी करायचे. मी पाहिलेल्या काही सर्वोत्तम स्ट्रोक प्लेअरपैकी ते एक होते. मी त्यांच्याविरुद्ध खेळलो आहे. विशेष म्हणजे माझी पहिलीच लढत त्यांच्याविरुद्धच होती. रणजी ट्रॉफीतील इंदूरमधील ही लढत होती. तेव्हा त्यांनी आमच्याविरुद्ध 140 हून अधिक धावांची शानदार खेळी केली. त्या वेळी खेळपट्टीवर मॅट टाकलेली असायची. मॅटवरील खेळपट्टीवर खेळणे सोपे नव्हते. चेंडू सोडणेही सोपे नव्हते; पण कोल्हापूरमधून आपल्या कारकिदीर्ची सुरुवात करणारे निंबाळकर हे त्यात तरबेज होते. जेथे हा कार्यक्रम होत आहे, त्याच पूना क्‍लबवर त्यांनी नाबाद 443 धावांची विक्रमी खेळी केली होती, असा उल्लेखही बोर्डे यांनी या वेळी केला.

सर्वोत्तम क्रिकेटपटू असूनही त्यांना भारतीय संघात का संधी मिळाली नाही, हे सांगताना बोर्डे म्हणाले, पाकिस्तान दौऱ्यापूर्वी खेळाडूंचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. चांगले मध्यमगती गोलंदाज असलेले निंबाळकर एकदा शिबिरात गोलंदाजी करीत होते. त्यावेळी मैदानातील दवामुळे त्यांचा पाय घसरला आणि घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. याच शिबिरातून भारतीय संघाची निवड होणार होती. निंबाळकरांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतल्याने बोर्डे यांनी पूना क्‍लबचेही विशेष आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.