कोल्हापूरच्या महापौरपदी महाविकास आघाडीच्या निलोफर आजरेकर

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. कोल्हापूरच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची निवड झाली आहे. भाजप-ताराराणी आघाडीच्या बहुतांश नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने आजरेकर यांनी 48-1 ने निर्विवाद विजय मिळवला.

निलोफर आजरेकर यांना कोल्हापूरच्या 50 व्या महापौर होण्याचा मान मिळाला आहे. महापालिकेतील संख्याबळ पाहता आजरेकर यांच्या निवडीची घोषणा केवळ औपचारिकता होती. भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार अर्चना पागर यांना केवळ 1 मत मिळाले, तर आजरेकर यांना 48 मतं पडली.

महापौर निवडीसाठी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. एकमेव उपस्थित सदस्य कमलाकर भोपळे यांनी अर्चना पागर यांच्यासाठी मतदान केल्याने त्यांना एकच मत मिळाले. निलोफर आजरेकर यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.

दरम्यान, ऍड. सुरमंजिरी लाटकर कोल्हापूर महापालिकेच्या विशेष सभेत राजीनामा देत महापौरपदावरुन पायउतार झाल्या होत्या. अवघ्या सव्वादोन महिन्यात सुरमंजिरी लाटकर यांनी पद सोडले होते. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरमंजिरी लाटकर यांची 19 जानेवारी 2019 रोजी कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाली होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.