मुंबई : राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्व:तच्या हाताने ट्वीट करता येते का? याचा अभ्यास करावा लागेल असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. दरम्यान, त्यांच्या या टीकेला आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
विनायक राऊतांनी केलेल्या टीकेवरुन निलेश राणेंनी ट्विटरवरुन एकेरी उल्लेख करत विनायक राऊतांना उत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये निलेश यांनी विनायक राऊत यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन टीका केली आहे. “खासदार विनायक राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते सांगतोय. हा स्वतः दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो,” असे म्हणत निलेश राणेंनी संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी रिक्षाच्या वेगाना मर्सिडीजला मागे टाकले आहे असे ट्वीट करत प्रत्युत्तर दिले होते. याचसंदर्भात बोलताना, “एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचे. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल,” असा टोला विनायक राऊत यांनी लगावला होता.
एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का?
‘एकनाथ शिंदेंना आमदार केल्याचा मला पश्चाताप’ @Vinayakrauts @mieknathshinde @ShivSena #EknathShinde #UddhavThackeray pic.twitter.com/5qWhdieejr
— Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) July 7, 2022
दरम्यान, विनायक राऊत यांनी मुलाखतीमध्ये आपल्यामुळेच एकनाथ शिंदेंना उमदेवारी मिळाल्याचाही दावा केला आहे. “मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आज त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे. मी शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं.” असे आव्हान विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.