मुंबई – आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. अशातच आता शिवसेना व ठाकरे परिवारावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या निलेश राणे यांनी देखील राऊत यांच्या त्या वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी केली आहे. याबाबत राणे यांनी ट्विट करत, ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील’ अशी टीकात्मक टिपणी केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये राणे यांनी, ‘उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाहीत, कुबड्यांवर सरकार चालवतात, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाहीत, हा माणूस पंतप्रधान झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं लावेल हा माणूस.’ असा जोरदार घणाघात केला आहे.
उद्धव ठाकरे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवतोय, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, हा माणूस जर PM झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं लावेल हा माणूस.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 23, 2020
काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, कोणत्याही गोष्टींवर टीका करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. भाजपचे काही लोक त्यात आघाडीवर असतात, अशा लोकांना भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे, असा चिमटा काढला होता. तसेच आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केला होता.