मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरून संपर्क केल्याची माहिती मिळाली आहे. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी जुन्या शिवसैनिकांना टोला लगावला आहे.
‘जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुरच्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील.’ असे ट्विट करत निलेश राणे यांनी शिवसैनिकांना टोला लगावला आहे.
विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी 12 नावे महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणूनही मातोंडकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरवातीला कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी झाली होती. मात्र त्यांनी त्या पक्षाचा राजिनामा वर्षभरापुर्वीच दिल्याचे सेना नेत्यांनी निदर्शनास आणून दिले. मातोंडकर यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्या गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या.
मंत्रीमंडळाने राज्यापाल नियुक्त सदस्यांची नावे गुरूवारी अंतीम केली. त्यात नवीन चार नावंचा समावेश राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेने केला आहे. यात एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांचे नाव असण्याची शक्यता आहे. या शिवाय शिवाजीराव गजरे, उत्तमराव जानकर आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा समावेश असल्याचे समजते.
खडसेंना मंत्रीपद देणार
खडसे यांना विधान परिषदेचे सदस्यत्व आणि मंत्रीपद देण्याचे आश्वासन शरद पवार यांच्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे पवार साहेब दोन मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगू शकतात, अशी माहिती राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. राजू शेट्टी हे सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णलयात उपचार घेत आहेत. त्यांच्या कार्यालयाकडे काही दिवसांपुर्वी जयंत पाटील यांनी स्व-परिचय मागितला होता. तो त्यांना देण्यात आला आहे, असे शेट्टी यांच्या निकटवर्तीयाने सांगितले.