इतरांचा वेळ किती तरी,
जाई व्यर्थची गावी घरी,
कामी लावता तो निर्धारी,
काया पालटेल गावाची।
कच्ची सामग्री गावच्या भागी,
ते पुरेपूर आणावी उपयोगी।
शोध करुनी नाना प्रयोगी,
माती करावी सोन्यासम।्।’
ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ही ओवी सार्थ ठरवणाऱ्या आहेत भूगावच्या लोकनियुक्त सरपंच निकिता सणस.
करोना महामारीचा संसर्ग तसा कमी झाला आहे. तर लसही लवकरच उपलब्ध होणार असली तरी काळजी घेणे आपले कर्तव्यच आहे. करोनाच्या अत्यंत भीषण काळात एकमेकांना आधार आणि सहकार्य करून जीवन व्यतीत करणे गरजेचे होते. समाजातील चलबिचल झालेल्या लोकांना आत्मविश्वास आणि जगण्याचे बळ देणं हे त्यावेळी प्रत्येकाचे आद्यकर्तव्यच होते.
आपण आपल्या परीने ते कर्तव्य निभावलेले देखील. पण यातही थेट रस्त्यावर उतरून अडल्यानिडलेल्या मदत करणे, भुकेलेल्यांना जेवण देणे, करोनाची एन्ट्री गावात होऊ नये म्हणून थेट गावच्या सीमांवर दक्षता ठेवणे. गावाच्या सीमांवर तैनात पोलीस, गावरक्षक यांना प्रोत्साहन देणे त्यांना काय हवे काय नको यासाठी जातीने लक्ष ठेवणे, परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी मदत करणे यांसह गावच्या विकासात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे, ते म्हणजे थेट जनतेतून निवडून आलेल्या भूगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निकिता सणस.
मुळशीचे प्रवेशद्वार असलेल्या भूगावच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच निकिता सणस या थेट जनतेतून महिला सरपंच म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी आपल्या कामातून भूगावकरांचे मन जिंकले आहे. फुगेवाडी हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील गाव त्यांचे माहेर. आध्यात्मिक, राजकीय वारसा लाभलेल्या फुगे घराण्यातील या कन्या. त्यांचे चुलते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर होते. हा वारसा घेऊनच त्यांनी भूगावच्या सणस घराचा उंबरा ओलांडला.
माहेरहून मिळालेल्या समर्थ वारशाच्या त्यांनी पती रमेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य उपयोग करून घेतला आणि मुळशी तालुक्यातील भूगावच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र काम करण्यास सुरुवात केली. आज या गावाच्या सरपंच म्हणून त्यांनी केलेले कार्य हे या गावाच्या विकासात मोलाचे ठरते आहे; पण या सर्व कामात त्यांचे पती रमेश सणस यांचे त्यांना लाभलेले योगदान सर्वांत महत्त्वाचे आहे.
राजकारणात कार्यरत करत असताना 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण कसे करावे याचा परिपाठ सरपंच निकिता सणस यांनी घालून दिला आहे.
स्वहितापेक्षा दुसऱ्याचे हित जोपासता आलं पाहिजे ही शिकवण त्यांना मिळाली असल्याने तसेच तसे संस्कार झाल्याने आज राजकीय क्षेत्रात वावरताना त्यांचे समाजहिताचे गुण दिसून येत आहेत. करोनाविरुद्धची लढाई ही खूप वेगळी होती. थेट रस्त्यापेक्षा घरी बसून अधिक लढाई लढायची गरज होती. लोकांनी अत्यावश्यक वस्तूंसाठी बाहेर न पडता त्या वस्तू घरी कशा उपलब्ध होतील हे पाहणं गरजेचं होते. गोरगरिबांनाच काय तर सर्वांनाच यामुळे खूप बरे वाटले अन् हे कार्य करण्यासाठी त्यांनी सर्व नियमांचे पालन करून त्यासाठी सरपंच निकिता सणस यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली जुळणीही नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
सामाजिक रसाची झलक आणि संवेदनशीलतेचे प्रतीक असणाऱ्या निकिता सणस यांनी करोनाच्या निमित्त आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी जे कार्य केले त्याला अविश्वसनीय होते आणि आताही आहेच. पोलीस बांधवांना, पोलीस मित्रांना भेटून त्यांच्या काळजीपोटी प्रत्यक्ष भेट घेतली, त्यांना सुरक्षिततेसाठी मास्क पुरविले, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात त्यावेळी संवेदनशीलता आणि त्यातून वाहणाऱ्या सामाजिक रसाची जाणीव होते. निकिता यांच्या सामाजिक कार्यातून त्यांनी लोकांशी साधलेला सुसंवाद, त्यांचे कार्य, त्यांची जनतेची जुळलेली नाळ आपल्या लक्षात येते.
संचारबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांचा मोठा प्रश्न होता. लोक उपाशी मरण्यापेक्षा आपल्या गावात शेकडो किलोमीटर दूर चालत जाण्याचे पसंद करत होते. त्यांना थांबवणे हे मोठे जिकिरीचे काम होते. थांबा म्हटलं तर,’ खायला द्या’ असे उत्तर मिळत होते. आपल्या भूगाव आणि परिसरातील अशाच कामगारांना भेटून तुम्ही जाऊ नका, तुमच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था आम्ही करतो असे बोलून सणस यांनी लागलीच अन्नधान्य देऊन कामगारांच्या चेहऱ्यावर हसूचे तरंग आणले होते. यातूनच माणुसकी आणि सामाजिक भान निकिता सणस यांच्या नसानसात आहे, याची कल्पना प्रत्येकालाच आली.
विकास हाच ध्यास
भूगावच्या विकासाचा विडा त्यांनी उचलला आहे. या गावासाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांमध्ये ग्रामपंचायतीमधील आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन आणि सर्वांशी चर्चाकरून, ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत विविध विकासकामे त्यांनी गावात केली आहेत. गावातील रस्ते, वीज, पाणी, पर्यावरण, ग्रामस्वच्छता, सुरक्षा, महिलासाठी रोजगार, महिला, मुली, विद्यार्थी व विशेष व्यक्तींसाठी विविध योजनांची अंमलबजावणी, गावाचे सुशोभिकरण, शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढ यांसारख्या कार्यक्रमात आणि त्यांनी राबवलेल्या उपक्रमांतून त्यांच्या कार्याची यशस्वी दिशा दिसून येत आहे.
एक उत्तम प्रवचनकार
भूगावच्या विद्यमान सरपंच निकिता रमेश सणस या उत्तम प्रवचनकार आहेत. अध्यात्माचा त्यांचा अभ्यास आणि उत्कृष्ट वक्तव्य ही त्यांची विशेष भाषाशैली आहे. अनेक वर्षांपासून त्या पंढरपूर पायी वारी भक्तिभावाने करीत आहेत.
पुरस्कार
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य करोना योद्धा सन्मान
महत्त्वाची कामे
मुळशी प्रादेशिक टप्पा – 2 मधून गावाला पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न
भूगाव पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात जाण्यास विरोध
करोनातील ठळक कार्य
भूगाव चेकपोस्टवर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी
गावांत वेळोवेळी हायपोक्लोराईची फवारणी
परप्रांतीय मजुरांना मूळ गावी जाण्यासाठी मदत
ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी आणि आशा सेविका यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अंतर्गत सर्वेक्षणाचे काम करून रुग्णांना त्वरित उपचार देण्याचे काम
करोनाबाबत मोफत तपासणी
लहान मुले आणि 60 वर्षांवरील वृद्ध यांची तपासणी
घरातच विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांना अन्नधान्य-पाणीपुरवठा
विविध सरकारी कार्यालयांमध्ये सॅनिटायझरचे आणि आर्सेनिक अल्बम-30 औषधाचे वाटप
रुग्णांना गावातल्या गावातच उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेपासून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.
गावात जनजागृतीपर पत्रके वाटणे,
नियंत्रण कक्षाची स्थापना
अत्यावश्यक सेवा-वस्तूंच्या दुकानांसमोर सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रयत्न करणे गणेशोत्सव काळात करोना नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजीमहाराज जलाशय आणि प्रफुल्ल चोघे तलाव येथे केलेली विसर्जन व्यवस्था प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा करून नागरिकांना सेवा पुरवण्यात आल्या.