पुण्याच्या बिबवेवाडीत रात्रीचा थरार; भर रस्त्यात तरुणावर चाकूने सपासप वार

दहशतीमुळे दुकाने पटापट बंद : दोन दिवसांनी दाखल झाला गुन्हा

पुणे – लोअर बिबवेवाडीत भर रस्त्यात खुनाच्या प्रयत्नाचा थरार घडला. किरकोळ कारणावरुन तरुणावर दोघांनी चाकूने सपासप वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या दुकानदारांना चाकू दाखवत दम दिल्याने सगळ्यांनी दुकाने बंद केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. जखमी तरुणाने शनिवारी तक्रार दाखल केल्यावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

याप्रकरणी सूरज अनंत कामथे (29, रा. शिल्पलेख सोसायटी, धनकवडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सौरभ भगत (24, रा. सहकारनगर) व राजू नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूरज आणि सौरभ तोंडओळखीचे आहेत. सौरभने सूरजकडून त्याचे सिमकार्ड वापरण्यास मागितले होते. त्याने ते पुन्हा सूरजला दुसऱ्या दिवशी दिले. दरम्यान, सूरजला राजगड पोलीस ठाण्यातून फोन आला की “तुम्ही ज्या मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकले आहे, तो चोरीचा आहे. तुम्ही तातडीने तो पोलीस ठाण्यात आणून जमा करा.’ ही बाब सांगण्यास सूरज हा आरोपीच्या घरी गेला होता. मात्र, तेथे सौरभ नसल्याने त्याने घरातील एका महिलेला ही बाब सांगितली. याचा राग येऊन सौरभने साथीदारासह सूरजला लोअर बिबवेवाडी येथे गाठले. तेथे त्याच्या तोंडावर धारदार चाकूने दोन वार केले. तर त्याचा साथीदार राजू याने दगड पाठीवर फेकून मारला.

 

यानंतर सूरजला जमिनीवर पाडून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. ही घटना आजूबाजूचे नागरिक आणि दुकानदार पहात होते. ते सूरजला सोडवण्यास येत असतानाच आरोपीने हातातील चाकू उगारुन “कोण मध्ये येतो, त्याला खल्लास करुन टाकतो’ अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेले नागरिक व दुकानदार दुकाने बंद करुन पळून गेले. दरम्यान, गंभीर जखमी झालेला सूरज ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक के. बी. पावसे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.