पुणे – शहरातील रात्र महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत यश मिळविले आहे. पूना नाईट हायस्कूलचा ओंकार बने हा 79 टक्के गुण मिळवून प्रथम तर, 77 टक्के गुण मिळविणारा कुणाल बेंडल हा द्वितीय, तर पल्लवी जाधव या विद्यार्थिनीने 73 टक्के गुण मिळवत तिसरा आणि रात्र शाळेत मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत सरस्वती मंदिर संस्थेचे पूना नाइट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनिअर कॉलेजचा 81.42 टक्के निकाल लागला. परीक्षेला 114 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 92 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 15 पैकी 13 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम आलेला ओंकार बने हा शहरात दिवसा एका खासगी कार्यालयात ऑफिसबॉय म्हणून काम करतोय. द्वितीय आलेला बेंडल हा जनता वसाहत येथे राहत असून, तो हॉटेलमध्ये काम करून शिक्षण घेत होता.
प्रतिकूल परिस्थितीत यश
अर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दिवसा काम आणि रात्री अभ्यास करायचे. लहान असतानाच वडीलांचा आधार गेल्याने एकट्या आईच्या मजुरीच्या कष्टातून आम्हा तिघा भावंडाचा खर्च भागवावा लागत असे. दिवसा एका फायनान्स कंपनीत काम करून रात्री अभ्यास करायचे. आज बारावीच्या परीक्षेत यश मिळाल्याने घेतलेले कष्ट सार्थकी लागले, अशी भावना रात्रशाळेतून मुलींमध्ये प्रथम आलेली पल्लवी जाधव हिने व्यक्त केली.
दिव्यांग “चिन्मय’चे कौतुकास्पद यश
पूना नाईट स्कूलमध्ये शिकणारा आणि जन्मतः दिव्यांग असलेला चिन्मय मोकाशी याने 74.61 टक्के गुण मिळविले आहे. चिन्मय लहानपणापासून दिव्यांग आहे. त्याला एकट्याला शाळेत येणे शक्य नसल्याने त्याचे आई-वडील शाळेतून ने-आण करायचे. अनेकदा त्याची आईदेखील त्याच्यासोबत बसत असे. चिन्मय म्हणाला, मी आठवीपासून पूना नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. अभ्यासाबरोबरच शिक्षक, आई-वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला चांगले गुण मिळाले आहेत. यापुढे वाणिज्य शाखेत करीअर करण्याची इच्छा आहे.