-->

राज्यातील ‘या’ जिल्ह्यामध्ये रात्रीची संचारबंदी ?;विजय वडेट्टीवार यांचे संकेत

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोना रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. विदर्भातही करोनाने आपले हातपाय पसरले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांनी उपाययोजना हाती घेण्यास सुरूवात केली आहे. आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनही नियंत्रणासाठी सज्ज झाले आहे. दरम्यान, राज्यातील तीन जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला जाण्याची शक्यता आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत.

मागील काही दिवसांत औरंगाबाद, अमरावती, अकोला वर्धा, यवतमाळ आणि नागपूर शहरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे यातील काही शहरांमध्ये संध्याकाळी सहा ते पहाटेपर्यंत संचारबंदी लावण्याचा विचार सुरू आहे. राज्य सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत.

दरम्यान, विदर्भातील नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, रुग्णसंख्येतही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, “त्या त्या जिल्ह्यतील परिस्थितीनुसार तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. मात्र, त्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने लोकांनी काळजी घेतली नाही, तर संचारबंदी लावण्याची वेळ येऊ शकते. सध्या विरोधक-सत्ताधारी असे सर्वच आंदोलन करीत आहेत. करोनाचा वाढता प्रकोप पाहता सर्वच पक्षांनी आंदोलनापासून दूर राहिले पाहिजे. नेत्यांनीही अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे,” असे वडेट्टीवार म्हणाले.

तिन्ही जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकारन विचार करत आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल. अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यत मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. सर्व माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नसले तरी विदर्भाचे मंत्री असल्याने आम्ही विदर्भाच्या वाट्याचा निधी कोणीही पळवणार नाही याबद्दल दक्ष आहोत,” असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.