पुणेः शहरात अनेकठिकाणी कचरा उघड्यावर पडलेला दिसतो. कचरा उचल्यासाठी पालिका प्रशासनाची गाडी देखील ट्रफिकची समस्या असल्याने वेळेत पोहचत नाही. आता पुणे महानगरपालिका प्रशासनाने यावर एक प्लॅान तयार केला आहे. त्यानुसार आता पुण्यातील साफसफाई सकाळी नाही, तर रात्री केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनच्या वतीने देण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात हा प्लॅन अंमलात आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने उघड्यावर कचरा टाकू नका, असे सांगण्यात येते. तरी देखील अनेकांकडून नियमांची पायमल्ली करीत कचरा उघड्यावर टाकला जातो. यामुळे परिसरात दुर्गेंधी पसरते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे पुणे शहर सकाळी स्वच्छ असावे यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठीचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहने याचे नियोजन पालकेकडून करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेकडे कचरा उचलण्यासाठी नवीन ८१ गाड्या उपलब्ध असणार आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकण्यात येणारा कचरा रात्रीच उचलण्यात यावा यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करत आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार या गाड्यांचे वाटप करण्यात आले आहे. पुणे महानगर पालिकेकडे जुन्या आणि नवीन अशा ३५१ घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती मिळत आहे. पुणे शहरातील मंडई, तुळशीबाग, टिंबर मार्केट, खाऊगल्ल्या आणि महत्त्वाच्या बाजारपेठा या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते. या परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे पाहायला मिळते.