अबुजा (नायजेरिया) : नायजेरियामध्ये एका गॅस टँकरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 70 जण ठार झाले आहेत. नायजेरियाच्या आपत्कालिन प्रतिसाद एजन्सीने ही माहीती दिली आहे. उत्र मध्य नायजेरियातल्या नायजेर प्रांतात सुलेजा शहराजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
दुर्घटनाग्रस्त झालेल्या गॅसोलाईन टँकरमधून जनरेटच्या मदतीने गॅसोलाईन इंधन दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्यात येत होते. त्यादरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटाच्यावेळी टँकर जवळ अनेक लोक जमा झाले होते. तसेच गॅसोलाईन दुसऱ्या टँकरमध्ये हलवणारे अनेक कर्मचारी देखील होते. हे सर्वजण या गंभीर स्फोटात मरण पावले, असे राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे हुसैनी इसाह यांनी सांगितले.
स्फोटानंतर अनेक जण दूरवर फेकले गेले. त्यामुळे घटनास्थळी मदत आणि बचावाबरोबर अनेकांचा शोध देखील सुरू करण्यात आल्याचे इसाह यांनी सांगितले. आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर मालवाहतूक करण्यासाठी कार्यक्षम रेल्वे व्यवस्था नसल्यामुळे, प्राणघातक ट्रक अपघात होणे ही नेहमीची गोष्ट आहे.
सप्टेंबरमध्ये, नायजर राज्यात पेट्रोल टँकर आणि गुरे वाहून नेणाऱ्या दुसऱ्या ट्रकमध्ये धडक झाल्याने झालेल्या स्फोटात किमान ४८ लोकांचा मृत्यू झाला होता. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सनुसार,२०२० मध्ये १,५३१ पेट्रोल टँकर अपघात झाले होते. त्यामध्ये ५३५ जणांचा मृत्यू झाला आणि १,१४२ जण जखमी झाले होते.