क्षमतांचे सीमोल्लंघन करणारा वाटाड्या

मत सहल हमें जानो
फिरता है फलक बरसों
तब खाक के पर्दे से
इंसान निकलते है

जगण्यासाठी सर्व आवश्‍यक गोष्टी असतानाही माणूस नेहमी काहीना काही कारणांवरून तक्रार करीत असतो. मात्र, आपल्याला हात नाहीत, पाय नाहीत तर आपण तक्रार करणार ती कशाची? जन्मतःच हातापायांशिवाय जन्मलेला समकालीन काळातील जगप्रसिद्ध व्यक्ती म्हणजे निकोलस वुजिसिक ज्याला सगळेजण निक या नावाने ओळखतात. ज्याला जन्मदात्या आईने काही काळ स्वीकारले नाही. ज्याला आपल्या जगण्यापेक्षा आपण मेलेले अधिक योग्य राहील असे वाटत होते. यातून तो प्रचंड निराशेच्या दरीत लोटला गेला होता. इतके त्रासदायक जगण्यापेक्षा आपण आत्महत्या करून जीवन संपवावे, हाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. मात्र, कुठेतरी मनामध्ये असलेली जगण्याची उमेद त्याला जिवंत राहण्यासाठी उपयोगी पडली!

निकचा जन्म 4 डिसेंबर 1982 रोजी मेलबर्न येथे झाला. जगामध्ये खूप दुर्मिळातील दुर्मिळ असणारा टेट्रा एमेलिया सिंड्रोम सह त्याचा जन्म झाला. जन्मताच आलेल्या दिव्यांगावर मात करीत असताना निकला अधिक संघर्ष करावा लागला. परिवाराने निकला स्वीकारले होते. मात्र, समाजाचा खूप मोठा प्रश्‍न समोर उभा होता. तू पण सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगू शकतोस म्हणून आई वडिलांनी त्याला शाळेत घातले. शाळेतील आपल्या सोबतच्या विद्यार्थ्यांच्या आपल्याप्रती असलेल्या नकारात्मक भावनांचा निकवर गंभीर परिणाम झाला. जगणे असह्य होणाऱ्या वेदनांना घेऊन तो शाळेत जाऊ शकत नव्हता. दररोज कोणीतरी काहीतरी म्हणून त्याच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करायचे. आपण स्वत:ची मूलभूत कार्यही करण्यास असमर्थ आहोत, आपल्याला प्रत्येक कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते, अशा जीवनाला नेमका अर्थ काय; अशा अनेक प्रश्‍नांशी चालू असलेला त्याचा संघर्ष एकीकडे आणि लोकांची आपल्याप्रती असलेली मते पाहून येणारी विषण्णता दुसरीकडे! आपण जगातील इतर मुलांपेक्षा वेगळे का आहोत, याचे उत्तर शोधत असताना कित्येकदा एकटेच रडत बसावे! या सगळ्यातून जात असताना वाढत्या वयाबरोबर निकने आपले दिव्यंगत्व स्वीकारले. लोकांनी काहीही बोलले तर त्याला प्रतिउत्तर म्हणून केवळ एक स्मितहास्य देत राहा हा पालकांचा सल्ला त्याने ऐकला. आता अश्रूंची फुले होण्याचा प्रवास सुरू झाला होता. वयाच्या सतराव्या वर्षापासून अडचणींवर कशी मात करायची, जे आहे त्याचे समाधान आणि नाही त्याची तक्रार न करीत कसे ? जगायचे यावर निक व्याख्याने देऊ लागला. आज तो जगप्रसिद्ध वक्ता आहे.

मासे पकडणे, चित्रकला आणि पोहणे हे छंद जपत तो जगाला प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे. एक तपाहून अधिक काळ सार्वजनिक आयुष्यात असताना त्याने साठ पेक्षा अधिक देशांमध्ये जाऊन करोडो लोकांना जगण्याचे बळ दिले आहे. लेखक, कलाकार, संगीतकार, वक्ता अशा विविधांगी भूमिका तो यशस्वीपणे निभावत आहे. Life Without Limits, Unstoppable, Limitless, Stand Strong & amp; Love Without Limits अशी अनेक लोकप्रिय पुस्तके त्याने लिहिली आहेत. प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने निक आज अपेक्षित उंचीवरून मार्गक्रमण करीत आहे. काहीही झाले तरी Never give up विचार मनामध्ये ठेवत, संघर्ष करण्याची प्रेरणा त्याच्या आयुष्याकडून आपल्याला मिळते.

– श्रीकांत येरूळे.

Leave A Reply

Your email address will not be published.