“इसिस’च्या मोड्युल संदर्भात एनआयएकडून छापे

तीन संशयितांची चौकशी

नवी दिल्ली – इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे मोड्युल सक्रिय असल्यासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने आज केरळमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले. “इसिस’च्या कासारगोड मोड्युलशी संबंधित तपासाचा भाग म्हणून हे छापे घालण्यात आले. कासारगोडमधील दोन आणि पलक्कडमधील एका व्यक्‍तीच्या घरावर हे छापे घालण्यात आले, असे “एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे तिघेहीजण कासारगोडच्या “इसिस’च्या मोड्युलमच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. केरळमधून पळून जाऊन “इसिस’मध्ये सहभागी झालेले 21 युवक कासारगोडमधील होते. त्यामुळे या मोड्युलला “कासारगोड-मोड्युल’म्हणून ओळखले जाते. या 21 युवकांचा “एनआयए’कडून शोध घेतला जात आहे. या 21 जणांमध्ये कासारगोडमधील 17 आणि पलक्कडमधील 4 जण होते. यामध्ये चार महिला आणि 3 लहान मुलेही होती.

आज छापा घालण्यात आलेल्या संशयितांकडून मोबाईल फोन, सीम कार्ड, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, अरेबिक आणि मल्याळम भाषेतून नोंदी केलेली डायरी, वादग्रस्त इस्लामी व्याख्याता झकीर नाईकच्या भाषणांची डिव्हीडी – पुस्तके, धार्मिक विषयांवरील व्याख्यानांच्या डिव्हीडी, सीडी, सैय्यद कुतेबची पुस्तके आणि अन्य संशयास्पद साहित्य हस्तगत करण्यात आले. यातील डिजीटल साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून देण्यात येणार आहे. त्याचे योग्य विश्‍लेषणही केले जाणार आहे. सध्या या तिन्ही संशयितांची चौकशी केली जात आहे, असे “एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.