नवी दिल्ली – एनआयएने म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने मंगळवारी पाकिस्तान समर्थक दहशतवादी कटाच्या प्रकरणात जम्मू आणि काश्मीरच्या सात जिल्ह्यांमधील 15 ठिकाणी छापे घातले. यात अनंतनागमधील चार ठिकाणी, शोपियानमध्ये तीन, बडगाम, श्रीनगर आणि पूंछमध्ये प्रत्येकी दोन, बारामुल्ला आणि राजौरी जिल्ह्यात प्रत्येकी एका ठिकाणी छापे घालण्यात आले. या प्रकरणात एनआयएने 21 जून रोजी गुन्हा दाखल केला होता.
द रेझिस्टन्स फ्रंट,युनायटेड लिबरेशन फ्रंट जम्मू अँड काश्मीर, यांसारख्या नावाने कार्यरत असलेल्या विविध दहशतवादी संघटनांशी संबंधित लोकांचा या छाप्याच्या अंतर्गत शोध घेतला जात आहे. गेल्या वर्षी 2 मे रोजी एनआयएने या प्रकरणी जम्मू-काश्मीरमधील 12 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर शोधलेल्या ठिकाणांमध्ये यात पुलवामा जिल्ह्यातील आठ आणि कुलगाम, अनंतनाग आणि बडगाम जिल्ह्यातील प्रत्येकी एक आणि जम्मूमधील पूंछचा समावेश होता.
जम्मू आणि काश्मीरमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी दहशतवादी गटांनी स्थानिक तरुण आणि ओव्हरग्राउंड समर्थकांच्या सहकार्याने दहशतवादी कृत्ये करण्याची योजना आखली होती. लष्कर-ए-तोयबा , जैश-ए-मोहम्मद हिज्बुल-मुजाहिदीन , अल-बद्र आणि अल-कायदा यासह इतर दहशतवादी संघटनाही या कटात सामील आहेत.