श्रीनगर – दहशतवाद्यांना केल्या जात असलेल्या अर्थ सहाय्याच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने जम्मू काश्मीरमधील विविध ठिकाणी बुधवारी छापे घातले आहेत. बारामुल्ला जिल्ह्यात हे छापे घालण्यात आल्याचे “एनआयए’च्या सूत्रांनी सांगितले.
सीमेपलिकडील व्यापारातून मिळालेल्या पैशाचा जम्मू काश्मीरमधील दहशतवादासाठी गैरवापर करणाऱ्या संशयितांविरोधात हे छापे घातले गेले, असे सूत्रांनी सांगितले. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफसारख्या अन्य सुरक्षा दलांच्या सहकार्यातून हे छापे घातले गेले.
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरून दोन ठिकाणी सुरू असलेला सीमेपलिकडील व्यापार 18 एप्रिल 2019 रोजी भारताने स्थगित केला होता. शस्त्रे, अमली पदार्थ आणि बनावट नोटांची तस्करी या सीमेपलिकडील व्यापाराच्या माध्यमातून केली जात असल्याचा संशय होता.
पूंछ जिल्ह्यातील चाकन दा बाग आणि बारामुल्ला जिल्ह्यातील सलामाबाद येथील व्यापाराच्या माध्यमातून जम्मू काश्मीर आणि सीमेपलिकडे पाक व्याप्त काशमीरमध्ये राहणाऱ्या स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र ही दोन्ही ठिकाणे भारताने बेमुदतपणे स्थगित केली आहेत.