निलंबित उपअधीक्षक देविंदर सिंगविरोधात एनअयएचे आरोपपत्र

जम्मू – दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याबद्दल जम्मू काश्‍मीरचे निलंबित पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग यांच्याविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने आरोपपत्र दाखल केले आहे. देविंदर सिंगसह 6 जणांच्याविरोधात “एनआयए’ने आरोपपत्र दाखल केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देविंदर सिंगव्यतिरिक्‍त हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर सय्यद नवीद मुश्‍ताक ऊर्फ नवीद बाबू तसेच हिज्बुलचे सदस्य इरफान मीर आणि रफी अहमद रथेर यांच्यासह व्यापारी तन्वीर अहमद वाणी आणि नवीद बाबूचा भाऊ सय्यद इरफान अहमद यांनाही अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

देविंदर सिंग याला जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. नवीद बाबू, रफी अहमद रथेर आणि इरफान शफी मीर या हिज्बुलच्या सदस्यांना सुरक्षितपणे आपल्या वाहनातून घेऊन जात असताना देविंदरला पकडण्यात आले होते. याशिवाय सोशल मीडियावरून त्याचे आणि पाकिस्तानी उच्चायुक्‍तांचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा आणि दहशतवाद विरोधी कायद्याखाली अटक केल्यापासून 90 दिवसांच्या आत दिल्ली पोलिसांना देविंदर सिंगविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात अपयश आल्यानंतर दिल्ली न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र, “एनआयए’चा तपास सुरू असल्याने त्याला तुरुंगातच ठेवले गेले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.