नवी दिल्ली – फरार खलिस्तानी दहशतवादी गुरजितसिंग निज्जर याचे सायप्रसमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्यानंतर त्याला दिल्ली विमानतळावर राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाकडून अटक करण्यात आली. त्याला पुढील तपासासाठी मुंबईला नेले जाणार असल्याचे समजते.
स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी भारतात पुन्हा दहशतवादी कारवाया घडवण्याच्या सोशल मीडियावरील कटाचा सुगावा एनआयएला लागला. त्यावरून निज्जर, हरपाल सिंग आणि मोईन खान हे तिघे रडारवर आले.
ते तिघे सोशल मीडियावरून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून एनआयएने मागील वर्षी जानेवारीत हरपालविरोधात शस्त्रास्त्र कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
त्यानंतर मागील वर्षीच्या मे महिन्यात निज्जर, हरपाल आणि मोईनसह चौघांविरोधात विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तपासादरम्यान निज्जरने देशाबाहेर पलायन केल्याचे समोर आले. तो ऑक्टोबर 2017 मध्ये सायप्रसला गेला. आता तिथून परत पाठवण्यात आल्याने निज्जर एनआयएच्या जाळ्यात आला आहे. तो पंजाबच्या अमृतसरचा रहिवासी आहे.